तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? सत्यजीत तांबेंनी निवडणुकीचा प्लॅन फोडला!

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा कोणाला यासंबंधी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सूचक वक्तव्य केलेआहे. तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? असे विचारले असता तांबे म्हणाले, ‘थोरात आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि आम्ही एका परिवारातील आहोत,’ असे सूचक वक्तव्य तांबे यांनी केले. भाजपचा अंतर्गत किंवा उघड पाठिंब्याबद्दल माहिती नाही, असं सांगत आपण आजही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत, असे सांगायलाही तांबे विसरले नाहीत.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकाच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तांबे यांनी प्रचाराची सांगता अहमदनगरमध्ये केली. यानिमित्त आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मतदारसंघातील सर्वच जिल्ह्यांत मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या पंधरा वर्षात या मतदारसंघात सर्वच घटकांशी चांगले ऋणानुबंध निर्माण केले आहेत. त्याचा मला चागंला फायदा होत आहे. तेच काम मी पुढे घेऊन जाणार आहे.

पुढे बोलताना तांबे म्हणाले, “थोरात आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आम्ही सर्वजण एका परिवारातील आहोत. मी भाजपकडे पाठिंबा मागितलेला नाही. त्यांनी आतून दिला की नाही, हे मला माहिती नाही. कोणी न मागता ते पाठिंबा देतील असे वाटत नाही. यासंबंधी त्यांच्या ज्या नेत्यांनी वक्तव्य केली असतील त्यांनाच यासंबंधी विचारावे. असे काही असल्याचे मला मीडियाकडूनच कळत आहे. मात्र, मी कोणाला संपर्क केलेला नाही आणि माझ्याशीही कोणी संपर्क केलेला नाही”.

“मी २२ वर्षांपासून काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. विविध पदांवर काम केले आहे. त्याच माध्यमातून या मतदारसंघातही परिवाराप्रमाणे जोडलो गेले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मधल्या काळात जे राजकारण झाले, त्यावर मला आता काहीच बोलायचे नाही. वेळ आल्यावर यावर सविस्तर बोलणार आहे. मी अपक्ष उमेदवार असल्याने सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आमच्या परिवाराशी जोडले आहेत. सर्वांशीच आमचे ऋणानुबंध आहेत,” असेही तांबे म्हणाले.

Source link

Balasaheb ThoratCongressnashik graduate constituencysatyajeet tambesatyajeet tambe vs shubhangi patilनाशिक पदवीधरबाळासाहेब थोरातसत्यजीत तांबेसत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील
Comments (0)
Add Comment