पटोले म्हणाले, २ कोरे एबी फॉर्म दिले, तांबे म्हणतात, अर्धसत्य सांगताय, थांबा… बॉम्ब फोडतो!

अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीबद्दल माहिती देताना एबी फॉर्मचे नेमके काय झाले, याची माहिती देत तांबे यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा हा दावा तांबे यांनी फेटाळून लावला आहे. ‘पटोले यांचे हे वक्तव्य अर्धवट असून योग्यवेळ आल्यानंतर मी सर्व गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्यानंतर सर्व आश्चर्यचकित होतील,’ असा गौप्यस्फोट नाशिक पदवीधर मतदारसंघाचील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

तांबे यांनी आज नगरमध्ये प्रचारासाठी मेळावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी तांबे यांना पक्षाची उमेदवारी देताना एबी फॉर्मसंबंधीचा घटनाक्रम सांगितला होता. तांबे यांना दोन कोरे एबी फॉर्म दिल्याचा दावा त्यांनी केला होता. तरीही त्यांनी अपक्ष उमेदवारी करून पक्षाशी गद्दारी केल्यानेच निलंबनाची कारवाई केल्याचे पटोले यांनी सांगितले होते.

यासंबंधी सत्यजीत तांबे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने वेळेवर एबी फॉर्म न पाठविल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली. ही वस्तुस्थिती आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काल जे वक्तव्य केले ते अर्धवट आहे. वेळ आल्यानंतर मी या सर्व गोष्टीचा उलगडा करणार आहे. त्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित होतील,’ असेही तांबे म्हणाले.

नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना नाशिकमध्ये बोलताना एक वक्तव्य केले होते. निर्णय झाला आणि वेळ पडली तर भाजप एका रात्रीतून वातावरण फिरवू शकतो, असे विखे म्हणाले होते. यासंबंधी विचारले असता तांबे म्हणाले, ‘मी असे वक्तव्य ऐकलेले नाही. त्यामुळे यावर मी बोलू शकत नाही. भाजपने पाठिंबा दिल्याचा मला कोणताही संदेश आलेला नाही. मला कुणीही भेटलेले नाही, माझ्या कुणीही संपर्कात नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही.’ असेही तांबे यांनी स्पष्ट केले.

भाजपाने पाठिंबा दिला तर तुम्ही घेणार का? यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळत ‘या संदर्भात माध्यमांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारावे,’ असे तांबे म्हणाले. पुढे चालून काँग्रेसने निलंबनाची कारवाई मागे घेतली तर आपण काँग्रेस बरोबर जाणार का? असे विचारले असता तांबे म्हणाले की, ‘मी जर तरच्या प्रश्नावर वक्तव्य करणार नाही.’

Source link

congress ab formNana Patolenashik graduate constituencysatyajeet tambeनाना पटोलेनाशिक पदवीधरसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment