मृत सायलीचा लातूर जिह्यातील जळकोट तालुक्यात असणाऱ्या चिंचोली येथील दत्ता भानुदास कांबळे यांच्यासोबत २०१८ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर सहा महिने चांगले गेले. जोडीदाराच्या सोबतीने आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होतील, या आशेने सायली आनंदाने नांदू लागली. मात्र, सहा महिन्यानंतर सासरच्यांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली.
तुम्हाला मामांचा पाठिंबा आहे का? सत्यजीत तांबेंनी निवडणुकीचा प्लॅन फोडला!
“तुला स्वयंपाक येत नाही. तू आम्हाला पसंत नाही”, असे टोमणे मारुन “रिक्षा घेण्यासाठी ८० हजार रुपये माहेरहून घेऊन ये” म्हणत छळ करण्यास सुरवात केली. पण सायली आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेवर ती राहू लागली. माहेरच्या मंडळींनी एखादे लेकरु झाल्यानंतर सासरचा छळ कमी होईल, अशी समजूत घातली आणि सायलीने लग्नानंतर तब्बल साडेचार वर्ष संसारचा गाडा ओढला. मात्र, छळ कमी तर सोडाच दिवसेंदिवस जास्तच होत असल्याने अखेर सासरच्या छळाला कंटाळून सायलीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन जळकोट पोलीस ठाण्यात सायलीचा पती दत्ता भानुदास कांबळे, सासू तुळसाबाई भानुदास कांबळे, सासरा भानुदास कांबळे, दीर दीपक भानुदास कांबळे आणि जाऊ भाग्यश्री दीपक कांबळे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळकोट पोलीस करत आहेत.