संजय राऊत यांनी रितेश-जिनिलियाच्या एका चाहतीचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. ‘वेड… लागले’ असे कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला. ही तरुणी ‘वेड’ सिनेमातील ‘सुख कळले’ हे जिनिलिया-रितेशवर चित्रित झालेले गाणे गाताना दिसते आहे. या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो ट्विटरवर शेअर करण्याचा मोह संजय राऊत यांनाही आवरला नाही. जुही सिंह नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून राऊतांनी तो रीट्वीट केला.
का होतंय या तरुणीचं कौतुक?
जुहीच्या व्हिडिओवर रितेश देशमुखने कमेंट करत असे म्हटले की, ‘तू खूप कमाल आहेस जुही’. तर जिनिलियाने ‘वेल डन’ म्हणत जुहीचे कौतुक केले आहे. तर या चाहतीचे कौतुक होण्यामागचे कारण म्हणजे ती अमराठी आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे सुंदर मराठी गाणं कित्येक दिवस माझ्या डोक्यात आहे, माझ्या मराठी उच्चारांबद्दल माफ करा.’ तिने या गाण्याचे कौतुक करत रितेश, जिनिलिया, श्रेया घोषाल आणि अजय-अतुल यांनाही टॅग केले आहे. रितेश-जिनिलियाचे चाहतेही या ट्विटर युजरचे कौतुक करतायंत.
हे वाचा-अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये बिनसलं? Viral Video नंतर चर्चांना उधाण
‘सुख कळले’ हे या सिनेमातील एक रोमँटिक गाणे असून ते जिनिलिया आणि रितेश यांच्यावर चित्रित करण्यात आले. अजय-अतुल यांचे संगीत असणाऱ्या या गाण्याला आवाज लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने दिला आहे.
बॉक्स ऑफिसवर वेडने ५७ कोटींपेक्षाही अधिकचा गल्ला कमावला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने एन्ट्री करूनही ‘वेड’ची जादू चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली. रीलिज झाल्यानंतर एकूण ३१ दिवस ‘वेड’ थिएटरमध्ये आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सैराटनंतर आता वेड सिनेमाने दुसरे स्थान मिळवले आहे.