मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या युवकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असून तो बारामती येथील असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दौंड तालुक्यात मागील काही दिवसात खून करून मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत.
दौंडमध्ये कौटुंबिक वादातून सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आणून टाकल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खून करून मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी अधिक सतर्क होऊन मुख्य रस्ते, हायवे, दौंड तालुक्याला लागून असणारी नदी व डोंगरा भागात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
सदर मृत युवकाच्या डोक्यात छातीवर गंभीर इजा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर मृत युवक हा बारामती शहरातील खंडोबा नगर येथील असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
गेल्या आठवड्यात दौंडमध्ये सात खून
दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात सहा दिवसात ७ मृतदेह सापडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश होता. हे सातही खून चुलत भावाने केले असल्याचे तपासातून समोर आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नेमका यांचा घातपात झाला की, आत्महत्या केली याबद्दल पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेरीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.