विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान; नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी बाजी पलटणार? उमेदवारांची धाकधूक वाढली

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण पाच मतदारसंघांतील निवडणुकीचे मतदान आज, सोमवारी होत आहे. भाजपने विदर्भ, मराठवाड्यातील उमेदवारांसाठी प्रयत्नांची शर्थ सुरू केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील साठीमारीच्या राजकारणामुळे रंगत आली आहे. नाशिकचे मावळते आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसचे तिकीट नाकारून त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. या मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. तर, शेवटच्या क्षणी शुभांगी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अद्याप कोणालाही अधिकृत जाहीर पाठिंबा दिला नसला तरी अहमदनगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तांबे यांचा प्रचार सुरू केल्याचे भाजपच्या विखे गटातून बोलले जाते. दरम्यान, या पाचही मतदारसंघांतील मतमोजणी येत्या गुरुवारी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील आणि भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे पूर्ण तयारीने प्रचारात भाग घेताना दिसले. भाजपच्या म्हात्रे यांना शिंदे गटाचा सक्रिय पाठिंबा आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात अटीतटीची सरळ लढत होईल असे दिसते. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे हे रिंगणात असून, त्यांची लढत राष्ट्रवादीच्या बंडखोराशी होत आहे. पण, इथे काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत अपेक्षित आहे. निवडणुकीच्या तोंडावर किरण पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याचे सांगण्यात येते.

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उभे असून, त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार धिरज लिंगाडे आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार पुन्हा उभे असून, महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे रिंगणात आहेत. भाजपच्या दृष्टिकोनातून विदर्भातील दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत विधान परिषदेच्या निकालानंतर म्हणजेच २ तारखेस सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि विरोधी पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांचे नवे डावपेच ठरू शकतात, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

विखेंचे ‘कार्यकर्ते’ तांबे यांच्या पाठीशी

नगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केलेला नाही; मात्र, नगर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसद्वारे तांबे यांना पाठिंबा असल्याचे रविवारी सकाळी सूचित केले. तर, आमचे कार्यकर्ते तांबे यांना पाठिंबा देत आहेत. हा निर्णय पक्षाचा नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Source link

mumbai newsNashik newsncpradhakrushna vikhe patilsatyajeet tambevidhan parishad
Comments (0)
Add Comment