जिल्हा परिषदेच्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार निधी

म. टा. प्रतिनिधी, पुणे

जिल्हा परिषदेच्या शाळांना इमारती, संरक्षण भिंत, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून (डीपीडीसी) करण्यात येणाऱ्या खर्चात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पाटील बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल काळभोर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले १०५ विद्यार्थी, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत देशात, राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले दहा विद्यार्थी, पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणलेल्या सहा शाळा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांचा सन्मान करण्यात आला.

‘छोट्या शाळेत खगोलशास्त्राचा अभ्यासासाठी आभासी तारांगण उभारण्याच्या प्रयत्न आहे. मोठ्या शाळेतील सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही उपलब्ध दिल्या जातील. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्येत वाढ होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी कहा कलमी कार्यक्रम, निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात दोन ते तीन वेळेस विद्यार्थीनिहाय सुक्ष्म अभ्यासक्रम आराखडा, आचार्य विनोबा भावे ॲप, ३९७ आदर्श शाळा आदींबाबतची माहिती प्रसाद यांनी दिली.

विशेष अभ्यासक्रम तयार

‘बालपणीच्या शिक्षणाचा परिणाम भविष्यात होत असतो. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होण्यासाठी, त्यांना देश, भूगोल, राष्ट्रपुरुषांची माहिती होण्यासाठी विशेष अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. आगामी काळ गुणवत्तेचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्ता संपादन करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे,’ असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष प्रयत्न करा. मुलींच्या खेळ आणि शिक्षणासाठी अधिकच्या सुविधा मिळण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर करा,’ अशी सूचनाही पाटील यांनी केली.

Source link

funds for infrastructureMaharashtra Timeszilla parishad schoolszp schoolजिल्हा परिषदेच्या शाळापायाभूत सुविधा
Comments (0)
Add Comment