शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात असलेल्या सावरदेव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत येण्यासाठी तीन विद्यार्थ्यांना जंगलवाट आणि तानसा पाणलोट क्षेत्र मिळून दररोज नऊ किलोमीटर प्रवास करावा लागतो. चार प्लास्टिकचे पाइप जोडून तयार केलेल्या तराफ्यावरून अतिशय धोकादायक पद्धतीने ते पाण्यातील वाट पार करत शाळेपर्यंत पोहोचतात.
सरकारकडून मिळालेला वनपट्टा आणि तलावातील मासेमारी व्यतिरिक्त उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्याने काही आदिवासी कुटुंबे तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहतात. तिथून गावात यायचे तर आधी जंगलवाट तुडवावी लागते आणि त्यानंतर पाण्याचा प्रवाह पार करावा लागतो. त्यांच्या घरापासून गावातील शाळेचे अंतर साडेचार किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना रोज नऊ किलोमीटर अंतर पार करावे लागते.
पाण्यातील प्रवासासाठी प्लास्टिकचे पाइप एकमेकांना जोडून तयार केलेल्या तराफ्यावरून हे विद्यार्थी सावरदेव गावात येतात. इतर रहिवाशांनाही अधूनमधून अशी जीवघेणी कसरत करावी लागते. पण शाळेत जाण्यासाठी तीन आदिवासी विद्यार्थी आणि त्यांचे पालक दररोज असा धोका पत्करत असल्याचे समोर आले आहे.
मुलांनी शिकावे म्हणून घरातील एक व्यक्ती पूर्ण दिवस त्यांच्यासोबत राहते. त्यामुळे त्या व्यक्तीचा रोजगार बुडतो. या मुलांच्या शिक्षणाची सोय जवळील शासकीय आश्रमशाळेत करून त्यांचा धोकादायक प्रवास थांबवावा, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.