द कपिल शर्मा शोमध्ये ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
गँग्ज ऑफ वासेपूरच्या टीमशी कपिल शर्माने केलेल्या संभाषणात सिनेमाच्या मेकिंगविषयी अनेक गोष्टी समोर आल्या. अनुराग कश्यपच्या फिल्म मेकिंग स्टाइलविषयीही भाष्य केले गेले. अनेकदा असं व्हायचं की अनुरागच्या सिनेमाची स्क्रिप्ट किंवा सीन तयार नसायचा, तरीही शूटिंग व्हायचं अशा आठवणी या कलाकारांनी सांगितल्या. यावेळी बोलताना अनुराग कश्यपने एक मजेशीर किस्सा सांगितला की ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या सेटवर अभिनेता विकी कौशलला अटक झालेली.
अनुरागची अनोखी फिल्म मेकिंग स्टाइल
अनुराग यांचा हा किस्सा सांगायला सुरुवात केली अभिनेते पीयूष मिश्रा यांनी. झालं असं की कपिलने पीयूष यांना विचारलं की एक शब्द आहे ‘उटपटांग’, मात्र तुम्ही अनुरागसोबतच्या नात्याला ‘जुतपटांग’ का म्हणता? यावर पीयूष उत्तर देतात की ते अनुरागसोबत काम केल्यानंतर नेहमी ठरवतात की पुन्हा त्याच्यासोबत काम करायचे नाही. मात्र पुढील संधी आल्यानंतर ते त्याच्यासोबत काम करायला तयार होतात. पीयूष याचे कारण सांगताना म्हणाले की अनुरागच्या फिल्म मेकिंग स्टाइलमध्ये अनेकदा गोष्टी सुरुवातीपासून निश्चित नसतात, अनेकदा स्क्रिप्टही तयार नसते.
नेहमी सेटवर पोहोचतात पोलीस
अनुरागच्या सिनेमा सेटवर पोलीस पोहोचणेही फार सामान्य गोष्ट आहे, असे पीयूष म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘मला असे वाटते की जोपर्यंत अनुरागच्या सिनेमाच्या सेटवर कोण्याही व्यक्तीला, कॅमेरामनला किंवा त्याला स्वत:ला अटक होत नाही, तोपर्यंत मला विश्वास नाही बसत की फिल्मचं शूटिंग होतंय’. हाच किस्सा पुढे सांगताना अनुरागने सांगितलं की एकदा गँग्ज ऑफ वासेपूरच्या सेटवर विकी कौशलला अटक झाली होती.
अभिनेत्याला तुरुंगाची हवा खाली लागली
विकी ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता. तुम्ही जर सिनेमा व्यवस्थित पाहिला असेल तर काही सीनमध्ये विकी दिसतोही आहे. गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये अवैधरीत्या वाळूची तस्करी करण्याची दृश्य आहेत. रिअल लोकेशनवर ही दृश्य शूट करण्यात आल्याचे अनुरागने सांगितले. सिनेमात असे अनेक सीन होते जेव्हा त्याचं कॅमेरा युनिट अगदी कोठेही जाऊन शूट करायचे. अनुराग यांनी असा किस्सा सांगितला की, ‘सिनेमात अवैध वाळूचे उत्खनन करण्याचा एक सीन आहे, त्याठिकाणी एक स्थानिक वाळू माफिया अवैधरीत्या वाळू काढत होता आणि तिथे आम्ही कॅमेरा घेऊन पोहोचलो. त्यानंतर तिथून विकी कौशल आणि सेटवरील आणखी एकाला अटक झालेली.
गँग्ज ऑफ वासेपूर आहे विकीसाठी खास
‘मसान’ या सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधून त्याने खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात केली. विकी या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता. त्याचे वडील श्याम कौशल अॅक्शन डिरेक्टर होते. याशिवाय या सिनेमात छोटीशी भूमिकाही त्याने केलेली. विकीने अनेकदा या कामाबद्दल अनुराग कश्यपचे आभार मानलेत.