ठाणे शहरामध्ये गेल्या सात महिन्यांपासून राजकीय उलथापालथ वेगाने सुरू असून शिवसेनेचे शिंदे गट, उद्धव गट आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. अधूनमधून शिंदे आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडत असली तरी शिवसेनेच्या शिंदे गट आणि उद्धव गटाबरोबरच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये खुला संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कळवा-मुंब्र्यामध्ये सर्व नगरसेवक निवडून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. परंतु ह्याची कुणकुण लागल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील आपला आक्रमक पवित्रा कायम राखत येथील नगरसेवकांना विकू नका! असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कळव्यातील एका व्यक्तीच्या नावे फलक लावून शिंदे गटावर खोके-बोकेचा आरोप करण्याबरोबरच गद्दारी जनता माफ करणार नाहीचा सूर आळवण्यात आला होता. सोमवारी याच फलकावर नरेंद्र शिंदे या व्यक्तीच्या नावे फलक लावून शिंदे गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून टीकास्त्र सोडल्याचे समोर आले आहे. ‘जनता आता समजून चुकली कोण खरे, कोण खोटे, नगरसेवकांनीही समजून घ्या आता माणूस किती आहे हा खोटा…तेल गेले, तू गेल धुपाटणेही राहणार नाही’, असे सूचन या बॅनरद्वारे करण्यात आले आहे.
लबाड बोका ढॉंग करतोय! कळव्यातील ‘खोके-बोके’ बॅनरला बॅनरचेच प्रत्युत्तर
ठाणे : कळव्यातील जागोजागी लागलेल्या ‘नगरसेवकांनो स्वत:ला विकू नका’ अशा बॅनर्सद्वारे शिंदे गटाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोमवारी याच बॅनरवर ‘लबाड बोका ढाँग करतोय’, या आशयाचे फलक झळकवून आव्हाड यांना प्रत्युत्तर देणाऱ्या या नव्या बॅनरची शहरात चर्चा सुरू झाली होती. ‘करून करून भागले, नि प्रवचन झोडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले’, ‘विश्वास नाही उरला तुमच्या तुमच्याच नगरसेवकांनावर आता? आधी गळ्यात गळे आणि आता एकदम लाथ!, पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट?’, ‘मुंब्रा कळव्याच्या विकासाचं फुका लाटता श्रेय’, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी आणि जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून टिकास्त्र सोडण्यात आल्यामुळे अशा बॅनर्सवरून कळवा-मुंब्र्यातील राजकीय वातावरण तापले आहे.