काय घडलं नेमकं?
अबू धाबी येथून रविवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विमान येत होते. या विमानातून प्रवास करणारी परदेशी महिला इकॉनॉमी क्लासमधील जागेवरून उठून बिझनेस क्लासच्या जागेवर जाऊन बसली. हा प्रकार लक्षात येताच विमानातील कर्मचाऱ्याने तिला विचारणा केली. तिकीट इकॉनॉमी क्लासचे असल्याने बिझनेस क्लासमध्ये बसता येणार नाही, असे या कर्मचाऱ्याने महिला प्रवाशाला सांगितले. हे ऐकल्यावर परदेशी महिलेने कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करण्याबरोबरच ही महिला कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर थुंकली. इतर प्रवाशांना त्रास होत असल्याने सर्व कर्मचारी तिला शांत राहण्याचे आवाहन करीत होते. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
काही वेळाने तिने अंगावरील कपडे काढले आणि विमानातच अर्धनग्न होऊन फिरू लागली. वैमानिकानेही त्या महिलेला शांत राहण्यास सांगितले. अखेर मुंबईत विमान उतरल्यानंतर त्या महिलेला विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आले. कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून महिलेविरोधात विमान अधिनियम १९३७ कलम २२, २३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.