सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवड समित्या स्थापन केल्या आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी कुलगुरू निवड समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरू निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुलगुरू निवड प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
पुणे विद्यापीठाची कुलगुरू निवड प्रक्रिया रखडल्याने, विद्यापीठाला शैक्षणिक निर्णय घेण्यात अडचणी येतात; तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे ‘मटा’ने सातत्याने वृत्तांद्वारे प्रकाश टाकला. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आणि निवड प्रक्रियेला चालना मिळाली. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ १८ मे रोजी संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली होती. राज्यात जुलैमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले.
त्यानंतर माजी न्यायमूर्ती शुभ्रकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड शोधसमिती नियुक्त करण्यात आली. मात्र, समितीत यूजीसीच्या प्रतिनिधीचा समावेश नव्हता. मात्र, असे असतांनाही राज्य सरकारने कुलगुरू निवड प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू करून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती.
अध्यक्षांना ‘पुणेरी’ टच
पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सहस्रबुद्धे ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष होण्यापूर्वी ‘सीओईपी’चे संचालक म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी, ते ‘सीओईपी’त अनेक वर्षे कार्यरत होते. ‘आयआयटी कानपूर’चे संचालक डॉ अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर; तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे इतर सदस्य असतील, असे राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आले.