Jaya Ekadashi 2023 : माघ शुक्ल एकादशी तिथी, मुहूर्त, पूजाविधी, महत्व आणि मान्यता

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात. शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे. आज पाहूया जया एकादशी व्रत कसे आचरावे मुहूर्त, कथा आणि इतर मान्यता…

जया एकादशी व्रत मान्यता

साल २०२३ मध्ये १ फेब्रुवारी रोजी माघ शुक्ल एकादशी असून, या एकादशीला जया एकादशी म्हणून संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रत कथेचे विशेष पठण केले जाते.

जया एकादशी व्रत मुहूर्त

एकादशी तिथी प्रारंभ : मंगळवार ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ५३ मिनिटे
एकादशी समाप्ती तिथी : बुधवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून १ मिनिटापर्यंत

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने जया एकादशी व्रताचे आचरण बुधवार, १ फेब्रुवारी २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते.

एकादशी व्रत असे आचरावे

एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून, दान करावे आणि मग अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करु नये आणि मनात वैर वा क्रोध भाव आणू नये.

जया एकादशीच्या व्रताने दुःख, दारिद्र्य दूर होऊन धनलाभ, संपन्नता, समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला जया एकादशीचे व्रत सांगितले होते, अशी आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते.

Source link

ekadashi 2023ekadashi significancejaya ekadashi 2023jaya ekadashi date muhurta importancemagh shukla ekadashiएकादशी 2023एकादशी महत्व आणि मान्यताजया एकादशीजया एकादशी मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment