यावेळी अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. अनिल परब निवडक कार्यकर्त्यांसह म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आतमध्ये गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे त्यांनी म्हटले. मात्र, पोलिसांनीही कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करु नये. अन्यथा पुढील परिस्थितीला मी जबाबदार राहणार नाही, असे परब यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
वांद्रे पूर्व येथील म्हाडा वसाहतीमध्ये अनिल परब यांचे कार्यालय होते. माझा जन्म याच इमारतीत झाला. या इमारतीत मी लहानाचा मोठा झालो. आता या इमारती म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाही. सोसायटीची जागा मला वापरायला दिली होती. रहिवांशाच्या विनंतीवरुन जनसंपर्क कार्यालयासाठी सोसायटीची जागा वापरत होतो. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा किरीट सोमय्यांनी म्हाडा, लोकायुक्त यांच्याकडे जाऊन माझं अनधिकृत कार्यालय आहे हे भासवून मला नोटीस द्यायला लावली. म्हाडाच्या नोटीसवर मी ही जागा माझी नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तेव्हा म्हाडाने नोटीस मागे घेतली. यानंतर म्हाडा वसाहतीमधील रहिवाशांनी कार्यालयाचे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला. म्हाडाने त्याला नकार दिला. यासाठी किरीट सोमय्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकत होते, असा आरोप अनिल परब यांनी केला.
म्हाडाच्या ५६ वसाहतींचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. त्यावेळी रहिवाशांना २२० चौरस फुटांची आहे तेवढीच जागा द्यायची, हा डाव आहे. किरीट सोमय्या यांनी बिल्डर्सकडून सुपारी घेतली असावी, असा आरोप अनिल परब यांनी केला. पाडकाम करण्यात आलेल्या जागेची पाहणी करायला किरीट सोमय्या म्हाडाचे अधिकारी आहेत का?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला.
अनिल परबांनी म्हाडाच्या सीईओंना घेतलं फैलावर
या सगळ्या प्रकारानंतर अनिल परब यांनी म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांना फैलावर घेतले. वांद्रे येथील वसाहतीमध्ये पाडण्यात आलेल्या कार्यालयाशी माझा संबंध आहे का? नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा, तोपर्यंत मागे हटणार नाही, असे अनिल परब यांनी म्हटले. यावर आता म्हाडाकडून काय भूमिका घेण्यात येणार, हे पाहावे लागेल. अनिल परब म्हाडाच्या कार्यालयात गेल्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. या सर्व कार्यकर्त्यांना सोडा, असेही अनिल परब यांना म्हटले आहे.
किरीट सोमय्यांना अडवलं
म्हाडा कॉलनीतील कार्यालय पाडल्यानंतर किरीट सोमय्या वांद्रे येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना बीकेसी येथे रोखले. किरीट सोमय्या वांद्रे परिसरात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किरीट सोमय्या यांना वांद्रे येथे जाण्यापासून रोखण्यात आले. याशिवाय, अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.