शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राबविल्या जात असलेल्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गतच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळा नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांत नाशिक जिल्ह्यातील केवळ ५० शाळांनी नोंदणी केली असून, आता नोंदणीसाठी ३ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अवघ्या चार दिवसांची मुदत आहे.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दरवर्षी सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. संबंधित शाळांना ‘आरटीई’साठी नोंदणी करताना गेल्या तीन वर्षांतील प्रवेशाची आकडेवारी नमूद करावी लागते. तसेच अन्य माहितीही भरावी लागते. या माहितीची गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनला पडताळणी केली जाते. त्या पडताळणीनंतर ‘आरटीई’ प्रक्रियेसाठी शाळा ग्राह्य धरून संबंधित शाळांची आरटीई पोर्टलकडे नोंदणी केली जाते. या प्रक्रियेसाठी गेल्या आठ दिवसांत केवळ ५० शाळांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, शाळांना नोंदणीबाबत सूचना दिली असून चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.
– शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी २३ जानेवारीपासून शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू, नोंदणीसाठी शाळांना ३ फेब्रुवारीपर्यंत मुदत
– गेल्या आठ दिवसांत नाशिक जिल्ह्यातील केवळ ५० शाळांनी यासाठी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले
– गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला
– गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी असून, अद्यापही ३७२ शाळांची नोंदणी बाकी
शाळांची संख्या घटती
आरटीई प्रवेश प्रक्रियेचे गेल्या दोन वर्षाचा आढावा घेतला असता, या प्रक्रियेतून शाळांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे. २०२१-२२ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांनी सहभाग घेतला होता. ही संख्या २०२२-२३ मध्ये ४२२ होती. काही शाळांमध्ये शून्य पटसंख्या झाल्यामुळे या शाळांना ‘आरटीई’ प्रक्रियेतून वगळण्यात आले होते.
शाळा नोंदणीचा तपशील
जिल्हा आरटीईसाठी नोंदलेल्या शाळा
नाशिक ५०
धुळे ०
जळगाव ५१
नंदुरबार १