मुंबईकरांना मेट्रोच्या वाढीव मार्गांमुळे दिलासा; घाटकोपर-वर्सोवा मेट्रोच्या आजपासून वाढीव फेऱ्या

मुंबई : मुंबईकरांना मेट्रोच्या वाढीव मार्गांमुळे दिलासा मिळत असतानाच घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावरही आज, १ फेब्रुवारीपासून १८ जादा फेऱ्यांची भेट मिळणार आहे.

घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील दोन स्थानके मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७शी जोडली जाणार आहेत. या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आज, बुधवारपासून मुंबई मेट्रो वनच्या प्रवाशांसाठी दररोजच्या फेऱ्यांची संख्या ३९८पर्यंत पोहोचणार आहे. मुंबईतील पहिली मेट्रो अशी ओळख असलेल्या घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर प्रवाशांची गर्दी उसळलेली असते. त्यात या मार्गावरील दोन स्थानके मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७च्या टप्पा क्रमांक २शी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. ऐन गर्दीच्या वेळेस दोन फेऱ्यांमधील वेळ ३ मिनिट ४० सेकंदाची असेल. तर इतर वेळी दर पाच ते आठ मिनिटांनी एक फेरी धावेल.

मुंबई मेट्रो वनमार्फत प्रत्येक महिन्यास सुमारे एक कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रत्येक दिवसास सुमारे चार लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याचे रिलायन्स इन्फ्रोने स्पष्ट केले आहे. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्ग खुला झाल्यानंतर डी. एन. नगर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येत अनुक्रमे ८ हजार आणि ६ हजार प्रवाशांची वाढ झाल्याचे मुंबई मेट्रो वनने नमूद केले आहे. या वाढीव प्रवाशांच्या सुविधेसाठी जादा फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.

Source link

ghatkopar varsova metroIncrease in metro tripsmetro 2Ametro 7Mumbai metro
Comments (0)
Add Comment