बॉम्बे रुग्णालयात ३० ते ६० वर्षे वयोगटासाठी या चाचण्या करण्यात येणार असून, २ फेब्रुवारीला डॉ. जग्गनाथ हेगडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. मागील काही वर्षांपासून कॅन्सर सर्वच वयोगटामध्ये वेगाने वाढतो आहे. वैद्यकीय निदान उशिरा झाल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. हे निदान योग्यवेळी व्हावे यासाठी चाचण्यांची ही सुविधा निश्चितपणे फायदेशीर ठरेल, असे रुग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रकाश पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले.
सन २०२०च्या आकडेवारीनुसार, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये विविध प्रकारच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. स्तनांच्या कॅन्सरच्या रुग्णांची १३.५ टक्के, तोंडाच्या १०.३, गर्भाशयाच्या ९.४, फुफ्फुसाच्या ५.५ तर अन्य स्वरूपाच्या कॅन्सरच्या ५६.५ टक्के रुग्णांची नोंद यावर्षी झाली आहे. विविध वयोगटांतील १३ लाख २४ हजार ४१३ स्त्री-पुरुषांना कॅन्सर झाल्याचे आकडेवारी सांगते. या वाढत्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी निदान चाचण्यांची सुविधा असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बॉम्बे रुग्णालयात मॅमोग्राफी, पॅपस्मिअर, ट्युमर मार्कर, तसेच पीएसए, छातीचे एक्स-रे, अल्ट्रासाऊंडसारख्या निदान चाचण्या करण्यात येणार आहेत. याअंतर्गत अनावश्यक चाचण्यांऐवजी योग्यपद्धतीने कॅन्सरचे निदान करता येईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
मुंबईत माफक दरात कॅन्सरच्या चाचण्या उपलब्ध; बॉम्बे रुग्णालयात मिळणार सुविधा
मुंबई : कॅन्सरचे निदान योग्यवेळी झाले तर उपचारांनाही तत्काळ सुरुवात करता येते. अनेकजण यासाठीच्या चाचण्या वेळेत करत नाहीत. परिणामी परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे या गंभीर आजाराचे योग्यवेळी निदान व्हावे, याकरिता बॉम्बे रुग्णालयात या चाचण्या माफक दरात उपलब्ध केल्या जाणार आहेत. याअंतर्गत वेगवेगळ्या निदानपद्धतींद्वारे विविध प्रकारच्या कॅन्सरचे निदान करण्यात येणार आहे.