जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अंगणवाड्या चालविण्यात येतात. अंगणवाड्यांद्वारे कुपोषित मुलांसह अन्य मुलांच्या आहार, पोषण; तसेच शिक्षणाचा पाया रचला जातो. एक ते तीन वयातील बालकांच्या पोषणासह लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भीय सेवा यांच्याशिवाय पुढील तीन ते सहा वयातील मुलांना या सेवांसह अनौपचारीक शिक्षणही देण्याचे काम केले जाते. गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले जाते.
आजमितीला चार हजार ६६९ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी तीन हजार ६२२ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. परंतु, गेल्या वर्षभरात अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नसल्याचे समोर आले आहे. विविध गावांमधून इमारतींना जागा मिळत नसल्यानेच इतर ठिकाणी अंगणवाड्या भरविण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासह मंदिरे, समाज मंदिरे, खासगी जागेत या अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. भाड्याची खोली, व्यायाम शाळांमध्येदेखील पर्यायी व्यवस्था म्हणून या अंगणवाड्या भरवण्यात येत असल्याचे महिला व बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
जागा देता का जागा…?
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अंगणवाड्यांना जागा हवी आहे. जागा उपलब्ध केल्यास निधी उपलब्ध करून त्याद्वारे स्वतंत्र इमारत बांधणे शक्य आहे. मात्र, जागा देण्यास अनेक गावांमधून विरोध होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची इच्छा असूनही इमारती बांधता येत नाही. त्यामुळे १०४७ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाहीत. म्हणून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाला आता ‘अंगणवाड्यांना जागा देता का जागा…’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भोर, हवेली, जुन्नर, मावळ, पुरंदर या ठिकाणी अंगणवाड्यांना जागा उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती
अंगणवाड्या भरत असलेली ठिकाणे अंगणवाड्यांची संख्या
खासगी जागा-१७९
भाड्याची खोली-१४९
मंदिरे-३२
समाज मंदिरे-१२०
प्राथमिक शाळा वर्ग -३६६
इतर ठिकाणी-११६
ग्रामपंचायत कार्यालय-८५
इमारत नसलेल्या १०४७ अंगणवाड्यांपैकी २७२ ठिकाणी कामे सुरू आहेत. १४१ ठिकाणच्या अंगणवाड्यांना या वर्षी मंजुरी देण्यात आली आहे, तर पुढील वर्षीसाठी १०६ अंगणवाड्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ५२८ ठिकाणीच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला जागा हवी आहे.
– जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद