नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पहाटे पासूनच भाजीपाल्याचा बाजार सुरू होतो. मात्र आज हा भाजीपाला मार्केटमध्ये आला नसून व्यापाऱ्यांनी देखील कडकडीत बंद पाळत संपाला पाठिंबा दर्शवला आहे. माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात हे काम बंद आंदोलन करण्यात आल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची निवेदने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव, कामगार आयुक्त माथाडी बोर्ड यांच्याकडे सादर केलेली आहेत. या संदर्भात अनेक वेळा संयुक्त बैठका झाल्या आहेत. मात्र प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे संप, मोर्चे आणि उपोषणांचा पर्याय अवलंबला. परंतु माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न तसेच पडून असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, या संपाबाबतची नोटीस व प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर केले आहे. परंतु याबाबत सरकारने गांभीर्याने विचार केलेला नाही. आज संपूर्ण एपीएमसी मार्केट बंद असून व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.