हायलाइट्स:
- शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरूच
- माजी आमदार नीलेश राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका
- संजय राऊत यांना नीलेश राणेंची थेट धमकी
मुंबई: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, इशारे आणि प्रतिइशाऱ्यांना जोर चढला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांना तंबी दिल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेसह राऊतांवर कडवट शब्दांत टीका केली आहे. (Nilesh Rane Attacks Shiv Sena)
मुंबईत शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात प्रसाद लाड यांनी ‘वेळ आली तर शिवसेना भवन फोडू’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच लाड यांनी घूमजाव करत दिलगिरी व्यक्त केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं ते म्हणाले. त्यानंतरही शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका सुरू आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज लाड यांच्यासह विरोधकांवर तोफ डागण्यात आली आहे. बाटगे आणि शिखंडीच्या टोळ्यांना हाताशी धरून कोणी मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय वेबड्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. तरीही तेवढी मर्दानगी असेल तर अंगावर या,’ असं जाहीर आव्हान शिवसेनेनं दिलं आहे. ‘शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वत:च्या पायावर याल, पण जाताना खांद्यावर जायची वेळ येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्याशिवाय, संजय राऊत यांनी मीडियाशी बोलतानाही विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
वाचा: LIVE मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने
शिवसेनेच्या व संजय राऊतांच्या या भूमिकेवर नीलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, मोजून बघा. मोबाइलचे बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात की ‘होम मिनिस्टर’ म्हणतात तेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात?,’ असं राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
‘संजय राऊत धमकी द्यायला लागलेत. काय दिवस आलेत शिवसेनेचे? संपादक धमक्या देताहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करताहेत. संजय राऊत फटके खाणारच आहेत, पण त्यांना सेनाभवनच्या आत नेऊन फटके देणार,’ अशी धमकीच नीलेश राणेंनी दिलीय.
वाचा: शरद पवारांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक; भाजप म्हणतो…