राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) २२ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना आठ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. त्यासाठी ‘पवित्र’ पोर्टल तयार केले त्याचवेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ही चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर २०१७ नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आली नव्हती. परंतु, आता या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आठ दिवसांत प्रमाणपत्र कसे आणणार?
या परीक्षेसाठी दिलेल्या मुदतीमध्ये उमेदवारांना अर्जासोबत नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. आठ दिवसांत हे प्रमाणपत्र आणायचे कुठून, असा प्रश्न हे उमेदवार उपस्थित करीत आहेत. यामुळे अनेकजण अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
– राज्य परीक्षा परिषदेमार्फत घोषित केलेल्या या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असून, अर्ज करताना तीन जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करावी लागणार
– अराखीव गटासाठी ९५० रुपये आणि राखीव गटासाठी ८५० रुपये शुल्क असून, परीक्षेसाठी प्रवेशपत्र १५ फेब्रुवारीपासून होणार उपलब्ध होणार
– मराठी, इंग्रजी, उर्दू या माध्यमात परीक्षा देता येणार असून, मराठी आणि इंग्रजीचे भाषिक क्षमतेवरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक राहणार
– राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जानेवारीला या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून, ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली.