नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेससाठी धक्कादायक बाब म्हणजे सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे नाशिकची पदवीधर निवडणूक लक्षवेधी ठरली होती.महाविकास आघाडीने सगळी ताकद शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभी केली. या लढतीत सत्यजीत तांबे यांचे पारडे जड मानले जात असले तरी अंतिम निकाल पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईन, मला जिंकण्याची चिंता नाही, असे वक्तव्य केले होते.
शिक्षक-पदवीधर निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट
अशातच पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते आणि सत्यजीत तांबे यांचे जवळचे मित्र सनी निम्हण यांनी सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स पुण्यात लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. कडवट हिंदुत्व आणि कट्टर शिवसैनिक म्हणून विनायक निम्हण यांची ओळख होती. अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं. मात्र राजकारणाच्या काही टप्प्यात त्यांनी पक्षबदल केला. अखेरच्या काळात ते शिवसेनेत होते. विनायक निम्हण यांच्या घरावर आजही शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे. विनायक निम्हण यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. मात्र, त्यांचा सुपुत्र सनी निम्हण यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला होता. जवळचे मित्र म्हणून आज त्यांनी सत्यजीत तांबेंचे बॅनर्स पुण्यात लावले आहेत.