पुत्रवधू घरात येताच आई वडिलांना नातवाचे डोहाळे लागतात. कधी एकदा नातवंडांचं तोंड पाहू असं अनेकांना वाटतं. पण अडदाणे कुटुंबीयांना यासाठी मोठीच प्रतीक्षा करावी लागली. तब्बल सहा वर्षांनी घरात गोड बातमी कळाली. नागमणी अडदाणे गर्भवती राहिल्याने अडदाणे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. एकामागून एक दिवस मोजता सहा महिने आनंदाने उलटले पण सहाव्या महिन्यात नागमणीची प्रकृती अचानक खालावली. तिला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. घाबरलेल्या अडदाणे कुटुंबीयांनी कर्नाटकच्या सीमा भागातील महाराष्ट्रात असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे असणाऱ्या डॉ. पंकज मुंडे यांच्या रुग्णालयात नागमणीला दाखल केले. मात्र रक्तदाबाचा त्रास असल्याने आईसह बाळाच्या जीवाला धोका असल्याचे डॉ. पंकज मुंडे यांनी तपासून सांगितले अन् अडदाणे कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. ‘बाळाला सिझर करून बाहेर काढावं लागेल,’ असा जोखमीचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर
आता डॉक्टरांनाच देव मानत अडदाणे कुटुंबीयांनी सिझरला परवानगी दिली. अतिशय गुंतागुंतीची अन् जोखमीची शस्त्रक्रिया करून केवळ सहा महिन्याच्या अवघ्या ५०० ग्रॅम वजनाच्या जिवंत बाळाला नगमनीच्या पोटातून बाहेर काढण्यात डॉ. पंकज मुंडे यांना यश आले. वैद्यकीय क्षेत्रातील हे एक आश्चर्यच ठरले.
विमान ४० हजार फूट उंच हवेत, प्रवाशाला दोनदा हार्ट अटॅक, एका देवदुताने वाचवले प्राण…
आई सुखरूप होती. पण आता चिंता बाळाच्या प्रकृतीची होती. तळहातात बसणाऱ्या या इवल्याश्या जीवाला जगवायचं कसं? अखेर डॉ. पंकज मुंडेंनी जोखीम घेत ‘त्या’ बाळावर उपचार केले अन् मोठे आश्चर्य घडले. हातात घेणं अवघड असलेल्या बाळाचे अवघ्या ७० दिवसात १३०० ग्रॅम वजन झाले. ही किमया करून दाखवली डॉ. मुंडे यांनी. आता आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. डॉ. पंकज मुंडे अडदाणी कुटुंबीयांसाठी देवच ठरले आहेत.