यावेळी अजित पवार यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीविषयी विचारण्यात आले. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, माझ्यासारख्याने काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलणे उचित नाही. परंतु, एकेकाळी सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी बरीच वर्षे पक्षाचे काम केले आहे. सत्यजीत तांबे हा काँग्रेस पक्षाशी बांधिलकी असणारा नेता होता. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं. पण उमेदवार न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. नंतरच्या काळात वेगळा काही निर्णय झाला. पण सत्यजीत तांबे यांचे संपूर्ण घराणे काँग्रेसच्या विचारांशी बांधील आहे. माझा अंदाज आहे की, नाशिकमध्ये सत्यजीत तांबे हेच निवडून येतील, सध्या मतमोजणीत तेच आघाडीवर दिसत आहेत. निवडून आल्यावर ते योग्य निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
नाशिक पदवीधर मतदारसंघात मतमोजणीच्या दोन फेऱ्या पार पडल्या आहेत. दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना तब्बल ३१ हजार मतं मिळाली आहेत. तर मविआच्या शुभांगी पाटील यांना १६,३१६ मतं मिळाली आहेत. सत्यजीत तांबे यांनी १४६९३ मतांची आघाडी घेतली आहे. सध्याची परिस्थिती बघता सत्यजीत तांबे यांचा विजय सुकर मानला जात आहे. परंतु, अद्याप मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत.
पुण्यात सत्यजीत तांबेंच्या विजयाचे बॅनर्स
पुण्यात भाजपच्या सनी निम्हण यांनी आज सकाळीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स लावले. या बॅनर्सच्या माध्यमातून सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयाबद्दल आगाऊ शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. परंतु, मविआच्या शुभांगी पाटील यांनी हे बॅनर्स उतरवण्याची वेळ सत्यजीत तांबे यांच्यावर येईल, असे म्हटले होते.