बुलडाणा शहर गुन्हेगारीच्या शिखरावर वेगाने जात आहे. गांजा, दारु, वरलीच्या नादात तरुणाई लागली आहे. पोलीस केवळ हफ्ते गोळा करण्यात मग्न असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. दुधाची पिशवी उधार दिली नाही, म्हणून एका माथेफिरुने दूध डेअरीचा मालक आणि तिथल्या नोकराला चाकू खुपसून गंभीर जखमी केले आहे. हल्लेखोर हल्ला करुन फरार झाला आहे. २ फेब्रुवारी २०२३ च्या दुपारी १ वाजता ही घटना घडली.
धाड नाक्यावर मातृभूमी दूध डेअरी आहे. रवी तबडे या डेअरीचे संचालक आहेत. त्याठिकाणी अनिल मोरे आला आणि त्याने दुधाची पिशवी उधार मागितली. मोरे हा नेहमी धाड नाक्यावरील दुकानदारांना त्रास देत असल्याची माहिती आहे. तबडे यांनी मोरेला उधार दूध देण्यास नकार दिला. याने चिडून अनिल मोरेने स्वतःजवळील चाकू काढून तबडेच्या पोटात खुपसला. तबडेला वाचविण्यासाठी त्यांचा नोकर दिलीप शेषराव आल्हाटमध्ये पडला असता त्याच्या पाठीत मोरेने चाकू खुपसला.
रक्तस्त्राव होऊन रवी आणि दिलीप दोघेही गंभीर झाले. हल्लेखोर अनिल मोरे घटनास्थळावरून फरार झाला. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पण, धाड नाक्यावर वरली, दारू अवैधरित्या सुरु आहे. नाक्यावर गांजा पिणारी मुलं नेहमी बसलेली असतात. समोर असलेल्या शेतकी शाळा, मिल्ट्री स्कुल तसेच विदर्भ महाविद्यालयाच्या तरुणींना नाक्यावरील चिडिमारांचा त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस शहरात वाढत्या गुंडागर्दीकडे का दुर्लक्ष करीत आहेत, हे अनाकलनीय आहे. धाड नाक्यावरील प्रतिष्ठीत नागरिक अशा घटणांमुळे भयभीत आहेत.