दत्ता सोमवंशी यांच्या वडिलांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर आईने अंथरून धरलं. दिवसेंदिवस आजारपण वाढत गेलं. वडील तर गेले पण पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई तरी वाचावी म्हणून दत्ताने कर्ज काढलं अन् आईच्या दवाखान्याचा खर्च केला. शेतात पिकलं की कर्जफेड करू असा विचार त्याने केला होता. पण, सततच्या नापिकीमुळे पेरणीचा खर्चही निघाला नाही. यंदाही तीच परिस्थिती. शिवाय आईचं आजारपण लहान भाऊ आणि बहिणीचं शिक्षण, त्यात कर्जदारांने कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीची मालकी मिळावी म्हणून न्यायालयात डिक्रीसाठी दावा दिला आणि तडजोड झाली.
आता जमिनीचा फेर नावावर करावा आणि ती जमीन विक्री करून कर्ज फेडावं, असा दत्ताचा विचार होता. पण, फेर नावावर करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ सुरू करण्यात आली. आपल्या नावावर लवकर जमिनीचा फेर करून द्यावा म्हणून दत्ता तलाठ्याकडे तब्बल सहा महिने चकरा मारत होता. वारंवार विनंती केल्यानंतर दत्ताला लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्याच्या लहान भावाने केला आहे. एक तर डोक्यावर कर्ज, घराची जबाबदारी, आर्थिक अडचणीमुळे नको असतानाही जमिनीसाठी तडजोड करावी लागली, त्यात लाचेची मागणी, त्यामुळे दत्ता तणावाखाली वावरत होता.
आता ही आणखी पैशांची तडजोड कशी करायची, हा प्रश्न त्याच्या डोक्यात सतत येत होता. या तणावातून अखेर त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने प्रशासनाच्या विरोधात मोबाईलवर स्टेटसही ठेवलं होतं. दत्ता सोमवंशीच्या या टोकाच्या निर्णयाने पंचक्रोशीत हळहळ पसरली होती. दत्ता सोमवंशीच्या पश्चात आई, लहान भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.