महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात येईल आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; तर या दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि ओळखपत्र परीक्षेच्या प्रत्येक दिवशी सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र आणि प्रवेशपत्राची मागणी केल्यावर दाखवता आले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी करोना प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यंदापासून नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले आहे. या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला नियमावलीची प्रत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेऊन ती प्रत दप्तरी ठेवावी, असेही ओक यांनी सांगितले आहे.
परीक्षेचा तपशील
बारावीची परीक्षा मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते मंगळवार २१ मार्च २०२३ या काळात होईल, तर दहावीची परीक्षा गुरुवार २ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडतील. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही. करोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत.