‘देशातील विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटनस्थळ दत्तक घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासह सहली आयोजित कराव्यात, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. विद्यार्थ्यांना संस्कृती, वास्तू, वारसा यांच्यासोबतच वन्यजीवन माहिती होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ही योजना तयार केली आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यटस्थळांचा विकास करण्याची योजना सरकारने आखली आहे.
काय आहे योजना
शहर, गाव, अभयारण्य किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण विद्यापीठाने निश्चित करून दत्तक घ्यायचे आहे. पर्यटनस्थळांची यादी www.incredibelindia.org या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित ठिकाणाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदी उपक्रम वर्षभर आयोजित करावे लागतील.
त्याचप्रमाणे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ, संग्रहालय, अभयारण्य, हस्तकला केंद्र अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची दोन ते तीन दिवसांसाठी अभ्यास सहल आयोजित करावी लागेल. त्यासाठी विद्यापीठांनी राज्यातील पर्यटन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे संग्रहालयासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ केले जाईल. याबाबतचे सविस्तर परिपत्रक ‘यूजीसी’चे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी प्रसिद्ध केले आहे
जादा काम करावे लागणार
उच्च शिक्षणात होणारे बदल, नवी धोरणे या संदर्भात ‘यूजीसी’कडून सातत्याने विविध मार्गदर्शक सूचना, परिपत्रके प्रसिद्ध करण्यात येतात. त्याशिवाय विविध केंद्रीय मंत्रालयांच्या राष्ट्रीय स्तरावरील योजनांशी संबंधित उपक्रम राबवण्याबाबत आदेश दिले जातात. आता यामध्ये पर्यटन मंत्रालयाच्या नव्या योजनेची भर पडली आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणांना जादा काम करावे लागणार आहे.