सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून कर्मचाऱ्यांनी गुरुवारी लाक्षणिक आंदोलन करून परीक्षा विभागाच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षेशी संबंधित कामकाज ठप्प राहिले.
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावी, रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
मात्र, राज्य सरकारने कोणतीही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात टप्प्याटप्प्यानुसार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत राज्य सरकारकडून कोणतीच दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली.
आंदोलनाचा भाग म्हणून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे कामकाज आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यानंतर १४ ते १६ फेब्रुवारीपर्यंत निदर्शने, काळ्या फिती लावून काम केले जाईल. त्यानंतरही काहीच दखल न घेतल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षकेतर कृती समितीच्या वतीने दिली आहे.
परीक्षा पुढे ढकलल्या
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका सत्र परीक्षांना बसला असून, आंदोलनामुळे गुरुवारी परीक्षेचे कामकाज झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी (३ फेब्रुवारी) होणाऱ्या सर्व परीक्षांचे फेरनियोजन (सुधारित वेळापत्रक) करण्यात येणार असून, या दिवशीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या फेर नियोजनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशा सूचना परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत. याबाबतची माहिती प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना द्यावी, अशी सूचना मंडळाने केली आहे.
विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या कामावर गुरुवारी बहिष्कार टाकला. राज्यातील विविध विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागण्यांबाबत आंदोलन सुरु केले.
याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती व शिक्षणमंत्री यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नां बाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निष्कर्ष न निघाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात व विद्यापीठांतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचे काम बंद आंदोलनाचे सुरू केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाची योजना कर्मचाऱ्यांना लागू करणे, रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे आदी मागण्या आहेत.