११ तारखेला चुकीचा फॉर्म मिळाला,तांबेंचा फोन आलेला, गुंजाळांचं प्रत्युत्तर, घटनाक्रम सांगितला

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या वादानं नवं वळण घेतलं आहे. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत प्रदेश काँग्रेसनं नागपूर शिक्षक आणि औरंगाबाद शिक्षकचे एबी फॉर्म पाठवल्याचा आरोप केला. याला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. अतुल लोंढे यांनी तांबे यांना प्रत्युत्तर देताना सचिन गुंजाळ यांचा उल्लेख केला होता. लोंढे यांनी “नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे एबी फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत” असं म्हटलं होतं. आता सचिन गुंजाळ यांनी पोस्ट करुन त्यांची सविस्तर भूमिका मांडली आहे.

गुंजाळ यांचं ट्विट जसच्यातसं

सन्माननीय अतुल लोंढे जी
आपण प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहात. आपण माहिती घेऊन बोलले पाहिजे. अगदीच पत्रकार परिषद घेण्या अगोदर आपण माझ्याशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता, तरीही मी वास्तविकता सांगितली असती. आपण चुकीची माहिती देऊ नये ही अपेक्षा आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ एबी फॉर्म वाटपासंदर्भात जे घडले ते आपणास सांगतो.

सर्वात महत्वाचे म्हणजे, मी मा. थोरात साहेबांचा OSD नाही तर प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या कार्यकाळात माझ्याकडे भारत जोडो यात्रेची जबाबदारी होती त्यामुळे घडलेल्या घटनेच्या दिवशी मी लुधियाना (पंजाब) येथे भारत जोडो यात्रेत राहुलजींच्या कॉर्नर सभेच्या तयारीत व्यस्त होतो. म्हणजे ११ व १२ जानेवारीला मी पंजाब मध्ये होतो महाराष्ट्रात नाशिक मध्ये नव्हतो.

११ जानेवारीला चुकीचा एबी फॉर्म मिळाला म्हणून सत्यजित तांबे यांनी मला फोन केला. त्यानंतर मी संघटन सरचिटणीस देवानंद पवार यांना फोन करून तुम्ही चुकीचा फॉर्म पाठवला आहे का? असे विचारले त्यावेळी, त्यांनी मी दुसरा फॉर्म पाठवतो याबाबत आपण कोणाला काही सांगू नका, असे मला सांगितले.

त्यावर मी त्यांना सांगितले की, ‘माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही कोणता फॉर्म पाठवणार आहात? त्याचा फोटो काढून मला पाठवा‘, असे सांगितले त्यावर त्यांनी मला कोऱ्या AB फॉर्मचा फोटो पाठवला. मी त्यावर त्यांना OK असा रिप्लाय दिला. हा संपूर्ण घटनाक्रम ११ जानेवारीचा आहे तोपर्यंत AB फॉर्म तांबे यांना मिळाला नव्हता. जो स्क्रीन शॉट आपण माध्यमांना दिला आहे तो ११ जानेवारीचा आहे आणि त्याक्षणाला देवानंद पवार नागपूर मध्ये होते आणि मी पंजाब मध्ये. त्यानंतर माझ्या माणसाला बोलावून त्याच्याकडे सीलबंद पाकीट देण्यात आले. म्हणजे तो स्क्रीनशॉट संगमनेर मध्ये AB फॉर्म ताब्यात मिळाल्याचा नसून, प्रदेशकडून पुन्हा चूक होऊ नये म्हणून मी कोणता AB फॉर्म आपण पाठवणार आहात याच्या खात्रीसाठी होता. तेव्हा AB फॉर्म नागपूरमध्ये देवानंदजी पवार यांचेकडेच होते.

प्रत्यक्षात १२ जानेवारीला सत्यजीत तांबे यांना AB फॉर्म मिळाले. ते देखील सीलबंद पाकिटात.
पुन्हा १२ तारखेला दुपारी १.३० वाजे दरम्यान मला सत्यजीत तांबे यांचा फोन आला, त्यांनी माझ्यावर संताप व्यक्त केला आणि मला सांगितले, AB Form नाव टाकून आलेला आहे, डॉ सुधीर तांबेचे त्यावर नाव आहे. दुस-या रकान्यात जिथे पर्यायी उमेदवाराचे नाव टाकता येते तिथे NIL लिहिलेले आहे.‘ त्यामुळे प्रदेश काँग्रेसने कोरे AB फॉर्म दिल्याचा दावा खोटा आहे. आदरणीय अतुल लोंढेंजी आपण माझा नामोल्लेख करून चुकीची माहिती देणे टाळावे.

आपला स्नेही
सचिन गुंजाळ

सत्यजीत तांबेंनी पटोलेंवर पहिला घाव घातला, आता बाळासाहेब थोरातांची लेकही मैदानात उतरली

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन सुरु झालेल्या वादाचा नवा अंक आज पाहायला मिळाला. सत्यजीत तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर पर्यायानं नाना पटोले यांचं नाव न घेता आरोप केले. नाना पटोले यांनी पक्षाचे प्रवक्ते यावर बोलतील, असं म्हटलं. अतुल लोंढे यांनी सत्यजीत तांबे यांना अर्ज भरायला उशीर का झाला यासंदर्भात प्रश्न विचारले. अतुल लोंढे यांनी सचिन गुंजाळ यांचा संदर्भ दिला. गुंजाळ यांनी अतुल लोंढेंचा दावा खोडून काढला. महाराष्ट्र काँग्रेस या वादावर कसा पडदा टाकणार हे येणाऱ्या काळात निश्चित होईल.

रोहित शर्माने केली खास खेळपट्टी बनवण्यासाठी सूचना, पाहा कसं असेल पीच…

Source link

Atul LondheBalasaheb ThoratMaharashtra politicsNana Patolenana patole vs satyajeet tambenashik graduate constituency electionsachin gunjalsatyajeet tambeनाशिक पदवीधर मतदारसंघसत्यजीत तांबे
Comments (0)
Add Comment