‘माझ्यावर दुसरी पत्नी व चार मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षेत दया दाखवावी’, अशी विनंती आरोपीने त्याला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर केली. मात्र, ‘आरोपीने दबावाखाली येऊन किंवा पीडित मुलीने उद्युक्त केले म्हणून हा गुन्हा केलेला नाही. अल्पवयीन मुलगी आरोपीच्या ताब्यात असताना, तिची काळजी व सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर असताना त्याने तिचा छळ करत हे घृणास्पद कृत्य वारंवार केले. त्यामुळे या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात तो कोणत्याही दयेला पात्र ठरत नाही’, असे न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात नमूद केले.
‘माझ्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तिच्या माहेरच्यांचा विरोध पत्करून मी दुसरा विवाह केला. त्या रागातून त्यांनी मला खोट्या प्रकरणात गोवले आहे’, असा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला. मात्र, ‘अल्पवयीन पीडितेने स्वत:च्याच वडिलांवर इतके गंभीर आरोप का केले, ते आरोप खोटे असतील तर ते कसे, याचे कोणतेच पुरावे आरोपीतर्फे देण्यात आलेले नाहीत. त्याउलट पीडितेचे आरोप व त्याविषयीची साक्ष अत्यंत विश्वासार्ह असून तक्रारदाराची साक्षही त्याला सहाय्यभूत आहे’, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवले.
काय होते प्रकरण?
सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, पीडित मुलगी खूप लहान असतानाच तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. पीडित मुलगी ही १३ वर्षांची असताना त्याने प्रथम तिला आपल्या वासनेचे बळी केले. हा छळ असह्य होत असल्याने मुलगी वारंवार आपल्या आजोळच्या नातेवाईकांकडे जात होती आणि पुन्हा घरी परतण्यास नकार देत होती. अखेर २०१६मध्ये तिने वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.