राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारीला घेतल्या जाणाऱ्या ‘टीचर्स अॅप्टिट्युड अँड इंटेलिजन्स टेस्टचे (टेट) अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक जाचक अटींमुळे अडचणी येत आहेत. तसेच हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधला असता, कोणीही उत्तर देत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी गोंधळात आहेत. अर्ज भरण्याच्या तारखेपासून अवघ्या २२ दिवसांत परीक्षेचे नियोजन करण्यात आल्यामुळे परीक्षार्थींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरतीप्रक्रियेचे आयोजन केले जाणार असून, त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ‘टेट’ची जाहिरात परीक्षा परिषदेमार्फत ३१ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक समस्या ‘टेट’चे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येत असून, हेल्पलाइन नंबरशी संपर्क साधला असता कोणीही उत्तर देत नसल्याचे या उमेदवारांनी सांगितले.
तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रमही परीक्षा परिषदेने अतिशय त्रोटक स्वरुपात दिल्याची माहिती या उमेदवारांनी दिली. परीक्षेची जाहिरात निघाल्यापासून अवघ्या २० दिवसांचा वेळ या अभ्यासासाठी मिळणार असल्यामुळे त्याचाही मोठा तणाव या उमेदवारांमध्ये आहे.
…अशा आहेत अडचणी
– जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये परीक्षा घेणे अपेक्षित असताना, अवघ्या २२ दिवसांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले
– अर्ज भरण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतही अनेक जाचक अटी असल्याची परीक्षार्थींची माहिती
– अर्जासोबत कागदपत्रे जोडताना ती ठराविक आकाराची असणे गरजेचे असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमधून २०० ते ४०० रुपये देऊन हे अर्ज भरून घ्यावे लागत आहेत
– अर्ज भरल्यानंतर दुरुस्तीची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नसून, अर्ज चुकल्यास तो पुन्हा भरण्यासाठी नव्याने ९०० रुपये भरावे लागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले
– नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट अर्जासोबत बंधनकारक असल्यामुळे अवघ्या आठ दिवसांत हे सर्टिफिकेट मिळविण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत आहे
ठराविक कोचिंग क्लासेसशी संगनमत?
परीक्षा परिषदेतील काही संशयित अधिकारी पुण्यातील ठराविक कोचिंग क्लासेसना झुकते माप देत असल्याचा संशय काही अन्य कोचिंग क्लासेसमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. ‘टेट’ची जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी दोन महिने पुण्यातील काही कोचिंग क्लासेसना परीक्षा परिषदेतील या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारीमध्ये परीक्षा असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या क्लासेसमार्फत लगेच विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केल्याचे अन्य काही कोचिंग क्लासेस चालकांनी सांगितले.