आज लतादीदींच्या प्रथम स्मृतिदिनी राज ठाकरेंनी त्यांना अभिवादन करणारी पोस्ट शेअर केली. यावेळीही त्यांच्या लतादीदींविषयी असणाऱ्या भावना स्पष्ट होतायंत. लतादीदींच्या जाण्याने काहीतरी तुटल्याची भावना होती, असे राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हे वाचा-लतादीदींना गमावल्याच्या दु:खातून आजही सावरले नाहीत हृदयनाथ
काय म्हणाले राज ठाकरे?
‘लतादीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ अशी पोस्ट राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी यामध्ये असे लिहिले की, ‘दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो-कोट्यवधी लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार.’
त्यांनी पुढे लिहिले की, ‘माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण यापुढे कदाचित अनेक पिढ्यांनासुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट कोट्यवधी लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.’
हे वाचा-लतादीदींच्या केवळ असण्याने या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये भरले रंग!
राज ठाकरेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली. शिवाय राज यांनी अत्यंत चपखल शब्दांमध्ये लतादीदींविषयी असणाऱ्या जनतेच्या भावना मांडल्या आहेत, अशाही कमेंट आल्या आहेत.