कुठे असणार लतादीदींचं स्मारक?
लतादीदींचं हे स्मारक मुंबईतील हाजी अली चौक इथं उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं. मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईतील ताडदेव इथं हाजीअली चौक या ठिकणी हे स्मारक बांधण्यात येणार आहे. भूमिपूजनला मंगेशकर कुटुंबीय,तसंच अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.
स्मारकाच्या भूमिपूजनाला लतादीदींच्या बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, भाचा आदिनाथ मंगेशकर तसंर इतर काही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. तर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह शिवाजी साटम, सुदेश भोसले आणि नितीन मुकेश या कलाकारांनीही हजेरी लावली.
मंगेशकर कुटुंबियांची मागणी
स्मारकाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेल्या मंगेशकर कुटुंबियांनी राज्य सरकारकडं विशेष मागणी केली आहे. मुंबईतला ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला लतादीदींचं नाव देण्यात यावं, अशी मागणी लतादीदींच्या कुटुंबियांनी केली आहे.
काय म्हणाल्या उषा मंगेशकर?
उषा मंगेशकर म्हणाल्या की, लतादीदींच्या स्मारकाचं भूमिपूजन झालंय, याचा आनंद आहे. तसंत मुंबई बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला लतादीदींचं नाव देण्यात यावं, अशी विनंती आम्ही राज्य सरकारकडं केल्याचंही उषा मंगेशकर यांनी सांगितलं.
‘लतादीदीचे स्मारक आम्हाला शिवाजी पार्कात नको’
लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्द्यावर राजकीय वाद सुरू झाला होता. काही नेत्यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावं अशी मागणी केली होती ,तर काही नेत्यांनी या स्मारकाला विरोध दर्शवला होता. यावर लतादीदींचे बंधू आणि सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकरयांनी त्यांचं मत व्यक्त करत सर्व नेत्यांना स्मारकावरून होणारे राजकारण थांबवण्याची विनंती केली होती.