लता मंगेशकर आणि महाराजा राज सिंह यांचे नाते
लतादीदीच्या आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती होती, जी त्यांच्यासाठी खूप खास होती. त्यांची मैत्री आणि नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. लतादीदींच्या आयुष्यातील ही एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे क्रिकेटपटू आणि महाराजे राज सिंह डुंगरपूर हे होते. ते राजस्थान (तेव्हाचे राजपुताना) मधील डुंगरपूरचे महाराजा होते. राज सिंह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षही होते.
राज सिंह यांनी सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा
संगीताव्यतिरिक्त लता यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्या अनेकदा भाऊ हृदयनाथ यांच्यासोबत क्रिकेट खेळायच्या. लता आपल्या भावासोबत वाकेश्वर हाऊसमध्ये क्रिकेट खेळायच्या आणि तिथेच त्यांची राज सिंह यांच्याशी भेट झाली. २००९ साली ‘मिड डे’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत राज सिंह यांनी सांगितले की, १९५९ मध्ये जेव्हा ते मुंबईत आलेले तेव्हा त्यांनी क्रिकेटर दिलीप सरदेसाई यांचे चुलत भाऊ सोपान यांना सांगितले की, ते क्रिकेट खेळल्याशिवाय राहू शकणार नाही. तर सोपान यांनी त्यांना सांगितलेले की याठिकाणी क्रिकेट खेळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाकेश्वर हाऊस. पण लता मंगेशकर आणि त्यांचे भाऊ तिथे खेळतात. त्यावेळी राज यांनी सांगितलेले की त्यांना काही फरक पडत नाही की तिथे कोण खेळतं आणि कोण नाही. त्यांना फक्त तिथे जायचे आहे. त्यांनी सांगितले की त्यावेळी लता मंगेशकर पूर्णपणे रेकॉर्डिंगमध्ये व्यग्र होत्या आणि राजही त्यांना फार बघायचे नाहीत. ते केवळ क्रिकेट खेळायचे आणि परतायचे.
लतादीदींनी राज यांना चहासाठी बोलावले
त्यानंतर एकेदिवशी लतादीदींनी राज यांना चहासाठी घरी बोलावले होते. या मुलाखतीत राज सिंह यांनी सांगितले की, जेव्हा ते लता यांच्या घरी गेले होते तेव्हा ते त्यांच्याकडे बघतच राहिले. त्या खूप सुंदर होत्या. राज सिंह मंगेशकरांच्या घरातून निघाले तेव्हा लतादीदी त्यांना बाहेरपर्यंत सोडायलाही आलेल्या आणि त्यांना सोडायला स्वत:ची गाडीही पाठवली. या भेटीनंतर त्यांच्यातील ओळख वाढू लागली होती, अनेकदा राज त्यांच्यासोबत रेकॉर्डिंगसाठीही येत असत.
क्रिकेटवरील लतादीदींचे प्रेम
असे म्हटले जाते की, क्रिकेटवरील प्रेमाने लतादीदी आणि राज सिंह यांना एकमेकांच्या जवळ आणले. दोघेही एकमेकांना खूप आवडू लागले होते, शिवाय असे बोलले जाते की राज यांची हृदयनाथ यांच्याशीही चांगली मैत्री होती. या मैत्रीमुळे राज आणि लता यांच्या बहुतेक भेटी घरीच होऊ लागल्या. इथेच दोघांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. राज सिंह डुंगरपूर यांनी कधी लग्न केले नाही, मात्र त्यांचे लतादीदींसोबतचे नाते आणि मैत्री अनेकदा चर्चेत आली होती. त्यांच्या नात्याची चर्चा माध्यमांमध्येही होत राहिली.
वडिलांना दिलेलं वचन
त्यावेळी राज आणि लता यांच्याविषयी असेही समोर आले की दोघे लग्न करणार आहेत, मात्र काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. २००९ साली theguardian.com मधील वृत्तानुसार, असे म्हटले जाते की राज सिंह यांचा त्यांच्या वडिलांवर विशेष जीव होता. त्यांच्या प्रेमासाठी आणि आदरापोटी राज यांनी त्यांना असे वचन दिलेले की ते कधी सामान्य घरातील मुलीला लग्न करून घरी आणणार नाही. याच कारणामुळे त्यांनी लता मंगेशकर यांच्याशी लग्न केले नाही. दोघांनी लग्न केले नसले तरी ते नेहमीच चांगले मित्र राहिले आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या पाठीशीही उभे राहिले.
‘भारतरत्न’ची घोषणा झाली तेव्हा एकत्र होते राज आणि लता
लतादीदींना २००१ साली जेव्हा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा झाली तेव्हा राज सिंह यांच्यासोबत त्या लंडनमध्ये होत्या. राज सिंह यांनी ‘मिड डे’ला दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटलेले की, त्यावेळी ते लता यांच्यासोबत लंडनमध्ये होते. त्यांना मध्यरात्री त्यांची भाची रचना यांचा फोन आला आणि त्यांनी ही बातमी दिली. राज सिंह म्हणण्यानुसार, लता मंगेशकर यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी लतादीदींसाठी चहा बनवला आणि ‘भारतरत्न’ मिळाल्यानंतर कसे वाटला हे विचारले. त्यावेळी लतादीदी म्हणाल्या होत्या की, ‘तुम्ही विचारत आहात म्हणून सांगते, खूप छान वाटतंय.’
लतादीदींनी केलं नाही लग्न
एकीकडे राज सिंह आयुष्यभर अविवाहित राहिले, तर लता मंगेशकर यांनीही लग्न केले नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंब आणि संगीतासाठी समर्पित केले. राज सिंह डुंगरपूर यांचे १२ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले. ते अल्झायमर या आजाराने त्रस्त होते. जरी लता मंगेशकर आणि राज सिंग एकत्र राहू शकले नाहीत, पण त्यांच्यासारखे नाते क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्यातील मैत्रीचे नाते अत्यंत मजबूत होते.