महिला अग्निशामक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या अपात्रतेवरून शनिवारी गोंधळ झाला. महिला उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मात्र भरतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित न राहिल्याने व शारीरिक उंचीच्या निकषात न बसणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रिया निकषानुसारच झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली. ही प्रक्रिया अग्निशामक या पदाची कर्तव्ये लक्षात घेता शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणी याबाबत निश्चित केलेल्या निकषानुसारच राबवली आहे. भरतीसाठी दिलेल्या वेळेच्या आत येणाऱ्या उमेदवारांना विहित मानक पूर्ण केल्यास पात्र ठरवले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ४ फेब्रुवारीला महिला उमेदवार भरती प्रक्रियेप्रसंगी निकष पूर्ण न केलेल्या ज्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते, त्यापैकी काही उमेदवारांनी परिस्थितीचा विपर्यास करून प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे आणले अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
भरतीमध्ये शारीरिक उंची मोजण्याची आणि अन्य साधनेही नियमानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रमाणित करून दिलेली आहेत. शनिवार, ४ फेब्रुवारीला महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना अंदाजे ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आले होते. नियमानुसार उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथमदर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले. मात्र वेळेत हजर न राहिलेले व शारीरिक उंचीच्या निकषात न बसलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
काय आहे निकष?
या भरतीसाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक उंची १७२ सेंमी आणि महिला उमेदवाराची शारीरिक उंची १६२ सेमी हा मानक निश्चित केलेला आहे.
किती पात्र, किती अपात्र?
अग्निशामक पदाच्या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले.
किती जणांच्या चाचण्या?
पात्र उमेदवारांतील १४ हजार ५९६ जणांनी मैदानी चाचणी आदी बाबी पूर्ण केल्या आहेत. तर उर्वरित ११ हजार ३६७ जणांची चाचणी केली जाणार आहे.