Nilesh Rane: ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारे गर्दी पाहून गाडीत लपले; वाघ म्हणे…’

हायलाइट्स:

  • सांगलीतील हरभट रोडवर मुख्यमंत्र्यांना विरोध.
  • भाजप कार्यकर्त्यांचा घोषणाबाजी करत ठिय्या.
  • निलेश राणे यांनी ट्वीटरवरून साधला निशाणा.

मुंबई: सांगलीतील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. या दौऱ्यादरम्यान हरभट रोड येथे भाजप कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला. मुख्यमंत्री निवेदन स्वीकारत नसल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. त्यावर शिवसैनिकही आक्रमक झाल्याने तिथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा तणाव निवळला असतानाच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी या घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ( Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray )

वाचा:‘राज्यपाल ‘ही’ यादी मंजूर करतील, कारण…’; रोहित पवार यांचं ट्वीट चर्चेत

भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी ‘शिवसेना भवन फोडू’ असे विधान करत त्यावर नंतर घुमजाव केले असले तरी या विधानाचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. शिवसेनेतून अनेक नेते आणि आमदारांनी लाड यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट शब्दांत इशारा दिला. ‘आम्हाला कोणी थपडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत नाहीतर एक अशी झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. या विधानाने मोठी खळबळ उडाली असतानाच सांगली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना झालेल्या विरोधाकडे बोट दाखवत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचा बाण सोडला आहे.

वाचा: मुंबईच्या लोकलबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…

‘हरभट रोड सांगली येथे निवेदन देण्यासाठी रोषात आलेली ३०-४० लोकांची गर्दी पाहून घाबरुन “५ मिनिटात गाडीत” लपून बसलेले मुख्यमंत्री म्हणे काल “थप्पड मारण्याची” वल्गना करत होते. वाघ म्हणे…’, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत निलेश राणे यांनी एक व्हिडिओही ट्वीट केला आहे. संतप्त जमावाला पोलीस अटकाव करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. निलेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये भाजपच्या आंदोलनाचा उल्लेख टाळत ‘लोकांची गर्दी पाहून’ असा उल्लेख केला आहे.

वाचा:वडेट्टीवार म्हणाले, करोनाची तिसऱ्या लाट ऑगस्टअखेरीस येण्याची शक्यता

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली जिल्ह्यातील पूर पाहणीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांनी भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज येथे पाहणी केली. त्यानंतर ते सांगलीतील आयर्विन पुलावर पोहचले. तिथून हरभट रोडवरील व्यापाऱ्यांशी संवाद साधून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार होते. हरभट रोडवर पोहचताच त्यांनी व्यापाऱ्यांची निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांनी रस्त्यातच ठिय्या दिला. अचानक गोंधळ सुरू झाल्याने मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने शिवसैनिक आक्रमक बनले. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्याकडे चालून जाणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी वेळीच रोखले. सुमारे पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना हरभट रोडवरून दुसरीकडे जाण्याचे आवाहन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र हरभट रोडवरच ठिय्या मांडून घोषणाबाजी सुरू ठेवली. पोलिसांनी काही भाजप कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वाचा:दुकानांच्या वेळांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आज अध्यादेश निघणार

Source link

nilesh rane criticizes cm uddhav thackeraynilesh rane latest newsNilesh Rane on Uddhav Thackerayshiv sena vs bjp latest newsuddhav thackeray in sangliउद्धव ठाकरेनिलेश राणेप्रसाद लाडशिवसेनासांगली
Comments (0)
Add Comment