जव्हारसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात विकास साधायचा झाल्यास शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. आदिवासीबहुल भागात शिक्षणाच्या सुविधांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहेत. त्यातच राज्य सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) तालुक्यातील तीन शाळांनी नोंदणी केली असून यात ४० विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होत असते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेची पालक प्रतीक्षा करत असतात. यावर्षी आरटीईअंतर्गत नोंदणी करण्यासाठी शाळांना २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी अशी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार तालुक्यातील भारती विद्यापीठ शाळेत आठ जागा, ज्ञानगंगा स्कूल २३ जागा, युनिव्हर्सल स्कूलमध्ये नऊ जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
प्रवेशासाठी लागणारे दस्तावेज
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट फोटोकॉपी आदी कागदपत्रे दाखल करावी लागणार आहेत. या प्रवेशासाठी प्रवेश फेरी राबविण्यात येते. त्यानंतर प्रवेश दिला जातो.
आदिवासी विकास प्रकल्प आश्रमशाळा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारअंतर्गत शासकीय व अधिनिस्त असलेल्या आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण, राहणे, खाणे, गणवेश, शैक्षणिक साहित्य हे मोफत असते. त्यामुळे ही शिक्षणपद्धती लोकप्रिय आहे.
आरटीईअंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश घेण्याची संधी मिळते. चांगले शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वृद्धिंगत होते.
– विशाखा अहिरे, पालक, जव्हार
जव्हार तालुक्यातील तीन शाळांत ४० विद्यार्थी आरटीईअंतर्गत प्रवेश घेऊ शकतात. पालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
– अमोल जंगले, गटशिक्षण अधिकारी, जव्हार