सविस्तर जाणून घेऊया.
अण्णा राजम मल्होत्रा असे देशातील पहिल्या महिला आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. अण्णा राजम मल्होत्रा १९५१ मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षेत बसल्या आणि आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देशातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या. अण्णा राजम यांचा जन्म १७ जुलै १९२४ रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण कोझिकोड येथून केले. नंतर चेन्नई येथील मद्रास विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अण्णा राजम यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि नागरी सेवेची तयारी सुरू केली.
कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे अण्णा राजम मल्होत्रा यांनी १९५१ मध्ये पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि देशाच्या पहिल्या महिला आयएएस अधिकारी बनून इतिहासात आपले नाव नोंदवले. अण्णा राजम यांनी मद्रास कॅडरमधून प्रशिक्षण घेतले.
आयएएस झाल्यानंतर अण्णा राजम यांनी आपल्या सेवेत देशाचे दोन पंतप्रधान आणि सात मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत सेवाकाळात काम केले. १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा दिल्लीत पार पडल्या. त्या काळात अण्णा राजम मल्होत्रा आशियाई क्रीडा स्पर्धेचे प्रभारी म्हणून काम पाहत होत्या. अण्णा राजम मल्होत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्रालयातही काम केले.
निवृत्तीनंतर अण्णा राजम मल्होत्रा यांनी प्रसिद्ध हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेडचे संचालक म्हणून काम केले. पुढे अण्णा राजम मल्होत्रा यांना त्यांच्या देशसेवेबद्दल १९८९ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.