काही वेळातच सिद्धार्थची वरात काढली जाणार आहे. त्यानंतर सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांचा राजेशाही पद्धतीनं विवाह सोहळा होणार आहे. नववधू आणि वराच्या रुपातील या जोडीला पाहण्यासाठी सिद्धार्थ आणि कियाराचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. काल रात्री झालेल्या संगीत सोहळ्यावेळी सिद्धार्थच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे संगीत सोहळा काही काळासाठी थांबवण्यात आला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा सूर्यगढ पॅलेसमध्ये सकाळपासूनच लग्नाची लगबग सुरू झाली. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचा मुहूर्त ३ वाजता असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यामुळे या दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ आणि कियारा पॅलेसमधील बावडी वेन्यू इथं सप्तपदी चालणार आहेत. त्यानंतर कोर्ट यार्डमध्ये एकमेकांना वरमाळा घालणार आहेत. याच ठिकाणी रात्री ८ वाजता रिसेप्शन होणार आहे.
दरम्यान, आज सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी याचं लग्न होत आहे. जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये होणाऱ्या या लग्नसोहळ्यासाठी ५ तारखेपासूनच पाहुणे येऊन दाखल झाले आहेत. त्यात करण जोहर, शाहिद कपूर, ईशा अंबानी यांसारखे अनेक सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. लग्नसोहळ्याला १५० जण उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
कियारा-सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यात ‘नो फोन पॉलिसी’
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीनं त्यांच्या लग्नातदेखील ‘नो फोन पॉलिसी’चा अवलंब केला आहे. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती केली आहे. यामुळे कियारा-सिद्धार्थच्या मेहंदी, संगीतचे फोटो व्हिडिओ चाहत्यांना पाहता आलेले नाहीत.
दिल्ली आणि मुंबईत होणार रिसेप्शन
लग्नानंतर सूर्यगढ पॅलेसमध्ये पार्टी होणार आहे. परंतु लग्नानंतरचं रिसेप्शन दिल्लीमध्ये आयोजित करणार असल्याचं कळते. दिल्लीत रिसेप्शन झाल्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा १० फेब्रुवारीला मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर मुंबईत देखील १२ फेब्रुवारी रोजी रिसेप्शन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.