शाळकरी मुलगी आई-वडिलांसोबत खाणीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुता धुता विद्यार्थिनी अचानक पाण्यात बुडू लागली. ती पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे दिसताच एकच गलका उडाला. आईने मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. पोटची मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून वडिलांनी जीव धोक्यात घालून तिला बाहेर ढकलले; मात्र ते स्वत:चा जीव वाचवू शकले नाहीत. पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
ही मन हेलावणारी घटना गडमुडशिंगी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे रविवारी दुपारी घडली. सतीश दत्तात्रय गोंधळी (वय ४५ वर्ष) असे मृत वडिलांचे नाव आहे. ऐन यात्रेपूर्वीच घडलेल्या या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गडमुडशिंगी येथील यात्रेला कालपासून प्रारंभ झाला होता. मात्र यात्रेपूर्वी घरोघरी यात्रेची तयारी जोरात सुरू होती. रविवारी सकाळी सतीश गोंधळी, पत्नी सिंधू आणि शाळकरी मुलगी तृप्तीसोबत घरातील अंथरूण, पांघरूण असे मोठे धुणे धुण्यासाठी गावातील खाणीवर गेले होते. मुलगी कपडे धुण्यासाठी पालकांना मदत करीत होती.
हेही वाचा : तृतीयपंथीयाचा १६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, फेसबुकवर आईने पाहिलं आणि…
पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली, हा प्रकार लक्षात येताच पोहता येत नसतानाही वडिलांनी पाण्यात उतरून मुलीला बाहेर ढकलले. मुलगी बचावली; मात्र, तोल गेल्यामुळे वडील पाण्यात बुडाले. पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला.
ऐन यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलीला वाचविताना पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सतीश यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
हेही वाचा : आता हेच तुझे बाबा, नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहिली, पण एका इच्छेमुळे मायलेकाचा जीव गेला