‘या प्रकरणात मी सात वर्षांपासून गजाआड असून खटल्याला विलंब होत आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा’, अशी विनंती तावडेने अर्जाद्वारे केली आहे. त्यामुळे न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने सीबीआयकडे खटल्याच्या प्रगतीची माहिती मागितली होती. ‘पुण्यातील न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात आतापर्यंत १५ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आहेत. आता केवळ सात ते आठ साक्षीदार तपासणे बाकी आहे. मी खटल्यातील विशेष सरकारी वकिलांशी बोललो. सुनावणी जलदगतीने झाल्यास खटला दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली’, असे पाटील यांनी खंडपीठाने सांगितले.
खटला पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने आणखी काही महिने थांबणार का, अशी विचारणा खंडपीठाने तावडेचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना केली असता, त्यांनी त्यास नकार दिला. ‘अर्जदार सात वर्षांपासून गजाआड असल्याने अर्जावर गुणवत्तेवर निर्णय द्यावा’, अशी विनंती त्यांनी केली. अखेरीस साक्ष झालेल्या सर्व साक्षीदारांच्या साक्षींची प्रत सादर करा, असे इचलकरंजीकर यांना सांगून खंडपीठाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटला येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल; सीबीआयची कोर्टात माहिती
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबतचा खटला येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सीबीआयने अॅड. संदेश पाटील यांच्यामार्फत मंगळवारी उच्च न्यायालयात दिली. तसेच या प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेला जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शवला.