आमिर खानचा भाचा इम्रान खान यानं ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तो जिनिलिया देशमुख सोबत झळकला होता. दोघांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर इम्रान चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाऊ लागला. इम्राननं बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत काम केलं त्यात दीपिका पदुकोण,कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. परंतु अचानक २०१५ साली इम्राननं अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. मात्र त्यानं केलेले सिनेमे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. इम्रानच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केले. पण २०१९ मध्ये हे दोघंजण वेगळे झाले. त्या दोघांना एक मुलगी इमारा आहे.
आता हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण नुकताच तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.इम्रान खान नुकताच विमानतळावर एका मुलीबरोबर दिसला होता. ही मुलगी म्हणजे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन आहे. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाल आहे. व्हिडिओमध्ये इम्रान आणि लेखाची केमेस्ट्री खूप छान जुळलेली दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहून लोकांना वाटतंय की इम्रानच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम आलं आहे. लेखा आणि इम्रानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.इम्रान आणि लेखाच्या नात्याबद्दल दोघांनी अद्याप अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
लेखाबद्दल सांगायचे तर ती दक्षिणेतील प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेत्री,निर्माती आणि डिझायनर आहे. ‘फ्रेम’ या इंग्रजी सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली. नंतर ती व्हिडिओ जॉकी म्हणून काम करू लागली. याशिवाय ती हिंदी सिनेमांतही दिसली आहे. यामध्ये ‘युवा’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘पीटर गया काम से’ आदींचा समावेश आहे.