शिर्डी, सोलापूर ‘वंदे भारत’मध्ये मिळणार सावजी चिकन, तांबडा- पांढरा रस्सा अन्…; वाचा संपूर्ण मेन्यू

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः संयुक्त राष्ट्रांतर्फे यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून (इंटरनॅशनल मिलेट्स इअर) जाहीर करण्यात आले आहे. यामुळे देशातील रेल्वेगाड्यांमध्ये देणाऱ्या येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भरडधान्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने घेतला आहे. याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या वंदे भारत एक्स्प्रेसमधून होणार आहे.

एकाच दिवशी शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणार आहे. या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या न्याहारी, जेवण यांबाबतदेखील आयआरसीटीसीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. ज्वारी, राजगिरा आणि नाचणीपासून बनवलेले विशेष खाद्यपदार्थ यांमध्ये मनसोक्त खाता येणार आहेत. दोन्ही गाड्यांमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत.

जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत. सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मांसाहारी खवय्यांसाठी जेवणात सावजी चिकन, चिकन कोल्हापुरी, तांबडा रस्सा हे पदार्थ मिळतील. या खाद्यपदार्थांची प्रादेशिक चव कायम राहावी, यासाठी स्थानिक महिला बचत गटांनी बनवलेल्या पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी बचत गट अस्तित्वात नसतील, त्या ठिकाणी अन्य पर्यायांचा स्वीकार केला जाईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच न्याहारी आणि जेवणाचे खाद्यपदार्थ निवडावे लागणार आहेत. शिवाय यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.

Source link

csmt to shirdi vande bharat expresscsmt to shirdi vande bharat express menuvande bharat expressVande Bharat Express trains in Maharashtraसीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
Comments (0)
Add Comment