हायलाइट्स:
- करोना निर्बंध शिथील केले, पण लोकल बंद
- मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लोकांना शिव पंख लावून द्या; मनसेचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
मुंबई: करोनाचा संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेनं पत्रक जाहीर करून मुंबईकरांनाही मोठी सवलत दिली आहे. मात्र, लोकलची दारे अद्यापही बंदच आहेत. त्यामुळं मुंबईकरांची कोंडी कायमच राहणार आहे. त्यामुळं निर्बंध शिथील होऊनही मुंबईकरांमध्ये फारसा उत्साह नाही. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. (MNS Targets CM Uddhav Thackeray)
वाचा: ‘आताच्या शिवसैनिकांना धड जय महाराष्ट्र बोलता येत नाही, ते आदेश बांदेकर…’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी उपरोधिक ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री साहेब सर्व आस्थापना सुरू केल्याबद्दल आपले आभार. मात्र, लोकल बंद आहेत. बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता,’ असं देशपांडे यांनी म्हटलं आहे. ‘आमचा सीएम जगात भारी…,’ असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
करोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. करोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता पाहून निर्बंध शिथील केले जात आहेत. कालही राज्य सरकारनं काही जिल्ह्यातील निर्बंध शिथील केले. सर्व सरकारी व खासगी कार्यालयं १०० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हा निर्णय दिलासादायक असला तरी लोकल बंदी उठल्याशिवाय त्याचा फारसा उपयोग होणार नाही. किमान लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, त्याकडंही सरकारनं दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळं विरोधक संतापले आहेत.
वाचा: काल नारळ फुटला अन् आज BDD पुनर्विकासाचे काम सुरू; आदित्य ठाकरे साइटवर