अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाची बहीण ब्युटी पार्लरचा क्लास करून आपल्या घराकडे जात होती. यावेळी संशयित विशाल देवरे, नीलेश अहिरे, गौरव पेलमहाले व इतर तीन साथीदारांनी बुरकुले हॉलजवळ तिची छेड काढली. हा प्रकार तरुणीने घरी जाऊन भावास सांगितल्यानंतर दोघे बहीण-भाऊ हे संशयितांना जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी मोरवाडी गावाजवळ संशयित विशाल देवरे व त्याच्या साथीदारांनी तिच्या भावाला मारहाण सुरू केली. एकाने धारदार कोयत्याने कपाळावर, पोटावर तसेच कमरेवर वार केले. यावेळी भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेली बहीणही जखमी झाली.
मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. बहिणीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत हुले, नीलेश आहिरे, विशाल देवरे तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोन संशयित फरार असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बहिणीची छेड, भाऊ जाब विचारायला गेला, आरोपींनी थेट कोयताच काढला, अन् पुढे घडलं भयानक
म. टा. वृत्तसेवा, सिडकोः बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावासह त्याच्या बहिणीवरही चार ते पाच टवाळखोरांनी धारदार कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मोरवाडी गावाजवळ घडली आहे.