लंडनच्या म्युझियममध्ये आहे दुर्मिळ खनिज, पुण्याशी आहे खास कनेक्शन, वाचून आश्चर्य वाटेल

पुणे : लंडनमधील नॅशनल हिस्टरी म्युझियमपासून ते जगभरील अनेक नामवंत संग्रहालयांमध्ये काचेच्या कुपित ठेवलेले रेखीव निळ्याभोर रंगाचे दुर्मीळ ‘कॅव्हेनझाइट’ बघताना अभ्यासकांची त्यावर नजर खिळली नाही तरच नवल! कुतुहलाने पर्यटक जेव्हा त्याची माहिती वाचतात, तेव्हा त्यांना पाटीवर, ‘तुम्ही पाहत असलेले हे दुर्मीळ, आकर्षक खनिज भारतात, पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात आढळते,’ अशी माहिती मिळते.

जैववैविध्य अन् भौगोलिक रचनांमधील विविधतेने समृद्ध पुणे जिल्ह्याच्या नैसर्गिक श्रीमंतीमध्ये ‘कॅव्हेनझाइट’ खनिज मानाचा तुरा ठरले आहे. जगभरात दक्षिण अमेरिकेतील ओरेगॉन शहरापाठोपाठ या खनिजाची गेल्या साठ वर्षांत केवळ वाघोलीमध्ये नोंद झाली आहे. ‘कॅव्हेनझाइट’चे शास्त्रीय गुणधर्म, त्याची रंगसंगती, रेखीव आणि नाजूक रचनेमुळे जगभरातील संग्रहालयांमध्ये त्याला मानाचे स्थान मिळाले आहे.

पुण्यात ‘कॅव्हेनझाइट’ सापडण्यामागे रंजक इतिहास आहे. दोनशे वर्षांपासून पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या नोंदी आढळतात. डॉ. पेर्रिगो आणि डॉ. झिमेर्नमॅन या दोन दाम्पत्यांना १९६०च्या दरम्यान ओरेगनमध्ये संशोधनादरम्यान ‘कॅव्हेनझाइट’ आणि त्याचाच भाऊबंद असलेला ‘पेंटागोनाइट’ ही खनिजे सापडली. त्यांनीच या खनिजांची नावे निश्चित करून शोधनिबंध प्रसिद्ध केला.

‘‘कॅव्हेनझाइट’ या खनिजामध्ये ‘कॅल्शियम’, ‘व्हॅनाडियम’ आणि ‘सिलिकेट’ या तिघांचे रासायनिक मिश्रण असल्याने त्याचे नाव ‘कॅव्हेनझाइट’ निश्चित करण्यात आले. यानंतर संशोधन झाले मात्र हे खनिज कुठेही सापडले नाही. दहा वर्षांनंतर पुण्यातील एका प्रदर्शनामध्ये अभ्यासकांना ‘कॅव्हेनझाइट’ ठेवलेले दिसले. संबंधित अभ्यासकाने त्याला पुण्यापासून १४ किलोमीटर अंतरावरील वाघोलीमध्ये दगडांच्या खाणीत ते सापडल्याचे सांगितले. पुढे १९८८च्या दरम्यान भाले असोसिएट्सचे डॉ. अरविंद भाले यांना वाघोलीतील त्यांच्या दगडखाणीमध्ये ‘कॅव्हेनझाइट’ आणि ‘पेंटागॉनाइट’ खनिजांचा मोठा साठा सापडला. यावर त्यांनी संशोधन अहवालही प्रसिद्ध केला. पाठोपाठ दोन वर्षांतच खनिज अभ्यासक आणि मॅट्रिक्स इंडिया कंपनीचे महंमद एफ. मक्की यांना त्याच परिसरातील एका खाणीत ही दोन्ही खनिजे आढळली. मक्की यांनीही शोधनिबंध प्रसिद्ध करून, जगभरातील भूविज्ञानाशी संबंधित शैक्षणिक संस्था, संग्रहालयांना या खनिजांचे नमुने आणि माहिती अधिकाधिक अभ्यासकांपर्यंत पोहोचवली,’ असे भूविज्ञान अभ्यासक डॉ. अजित वर्तक यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

आज, भारतातील भूविज्ञानाशी संबंधित संशोधन संस्थांबरोबरच अनेक संग्रहालयांमध्ये ‘कॅव्हेनझाइट’ आणि ‘पेंटागॉनाइट’ खनिज ठेवलेले बघायला मिळते. वाघोली भागातील काही खाणींमध्ये अनेक ठिकाणी खोदकाम करताना ही खनिजे सापडतात.

‘कॅव्हेनझाइट’वर पोस्टाचे विशेष पाकिट

‘भारतात सापडणारे ‘कॅव्हेनझाइट’आकाराने मोठे असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र टपाल विभागाने ‘कॅव्हेनझाइट’चे वैशिष्ट्य ओळखून काही वर्षांपूर्वी त्याचे विशेष टपाल पाकीट प्रसिद्ध केले होते. लंडनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये पुण्याचे पर्यटकांना वाघालोतील हे खनिज दिसते, तेव्हा अनेक जण आवर्जून संग्रहालय प्रमुखांना भेटून अभिमानाने आम्ही या भागात राहतो असे सांगतात,’ अशी माहिती डॉ. अजित वर्तक यांनी दिली.

खनिजाची निर्मिती कशी होते?

‘ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाहेर पडलेला लाव्हारस थंड होताना त्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. त्यातूनच भूस्तरामध्ये पोकळी तयार होतात. त्यानंतर झालेल्या रासायनिक प्रक्रियेतून या पोकळ्यांमध्ये वेगवेगळ्या खनिजांची निर्मिती होते. ‘कॅव्हेनझाइट’ या दुर्मीळ खनिजाची उत्पत्तीही याच प्रक्रियेतून झाली. हे खनिज अतिशय देखणे, आकर्षक मोरपंखी निळ्या रंगाचो आहे. मात्र, ते ठिसूळ असल्याने दागिने करण्यावर मर्यादा आहेत. तरीही काही रसायनांच्या मिश्रणातून ‘कॅव्हेनझाइट’चे आकर्षक दागिने बनवले जातात,’ असे महंम्मद एफ. मक्की यांनी सांगितले.

Source link

cavansitecavansite-huedpune rare cavansite-huedPune Rare Cavansite-Hued newsकॅव्हेनझाइट खनिज
Comments (0)
Add Comment