पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना २० टक्के अभ्यासक्रम हे ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करण्याची मुभा मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढील शैक्षणिक वर्षापासून ही मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वैकल्पिक किंवा अधिक श्रेयांकासाठीचे शिक्षण पूर्ण करता येणार आहेत. त्याचप्रमाणे पदवी अभ्यासक्रमांना हा निर्णय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार मूक्स किंवा स्वयम ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागू करण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी व त्यासंदर्भातील रूपरेषा ठरवण्यासाठी डॉ. मनोहर चासकर यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाला मान्यता देण्यात आली.
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी हा निर्णय २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. मूक्स किंवा स्वयम वेबसाइटवरील अभ्यासक्रम, यूजीसीने मान्यता दिलेले अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूक्स अभ्यासक्रम, पुणे विद्यापीठाने विकसित केलेले अभ्यासक्रम यातूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमाची निवड करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ऑनलाइन अभ्यासक्रमांची कार्यप्रणाली
– ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेवर आधारित मान्यता देण्यासाठीची यंत्रणा विषय आणि विद्याशाखानिहाय स्थापन करावी लागेल.
– अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी प्रवेश प्रक्रियेनंतर दहा दिवसांत कार्यशाळा घ्यावी.
– विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयात समन्वयकाची नेमणूक करावी. अधिष्ठात्यांनी समन्वयकांना प्रशिक्षण द्यावे.
– विद्यार्थ्यानी विषय निवडण्यापूर्वी समन्वयकाने विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करावे.
– विद्यार्थ्याने निवडलेल्या विषयांची माहिती, नियोजन, परीक्षा आणि पदव्युत्तर प्रवेश विभागाला कळवावीत.