पत्रकार शशिकांत वारीशे हे सातत्याने रिफायनरी विरोधी जनमताचा आवाज बुलंद करीत लिखाण करत होते. त्यांची शेवटची बातमी दि. ६ फेब्रुवारी, २०२३ च्या ‘महानगरी टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आंगणेवाडी यात्रेनिमित्त पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याची ती बातमी होती. आणि त्याचदिवशी दुपारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.
रिफायनरी प्रस्तावित होऊ शकणार्या भागात जमिनींचे व्यवहार करणारा पंढरीनाथ आंबेरकर असं संशयित आरोपीचं नाव आहे. याच आंबेरकरने सोमवारी दु. १.०० वाजता राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वारीशे यांना पाहिले. त्यानंतर बेसावध असलेल्या वारीशे यांच्या दुचाकीवर आपले वाहन चढवून त्यांची हत्या केली असा आरोप आहे.
रिफायनरी समर्थक संशयित पंढरीनाथ आंबेरकर त्यांच्या जीप वरती मागील बाजूस रिफायनरी समर्थक असं लिहिण्यात आल्याचं दिसत आहे. सोमवारी हा अपघात झाल्याचे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली होती. त्यानंतर या सगळ्या प्रकरणी तपास करण्याचे आदेश धनंजय कुलकर्णी यांनी राजापूर पोलिसांना दिले होते. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयित पंढरीनाथ आंबेडकर याला हातिवले येथून राजपूर पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आलं.
पत्रकार वारीशे यांना आधी रत्नागिरी येथे आणि नंतर बेशुद्धावस्थेत कोल्हापूर येथे तातडीने हलविण्यात आले. ते पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. मंगळवारी सकाळी ७.०० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वारीशे यांची हत्या म्हणजे लोकशाहीवर निर्घृण हल्ला आहे. अशाप्रकारे दिवसाढवळ्या पत्रकारांची हत्या होणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. संबंधित आरोपीला त्वरित अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. किंबहुना, अशी मागणी करणारे पत्र पत्रकार संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिलं.
वारीसे यांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून कार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थन समितीचे अध्यक्ष होते. सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा यामध्ये मृत्यू होतो हे प्रकरण संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.