राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीवर मोहोर, ईडीने केली कारवाई

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्तीवर मोहोर उमटवली गेली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागील वर्षी ही जप्ती केली होती. वरळी भागातील ‘सीजय हाऊस’ या बहुचर्चित इमारतीतील ही मालमत्ता आहे. अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मिलेनियम डेव्हलपर्स ही प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीतील बांधकाम कंपनी होती. या कंपनीने सन २००६-०७मध्ये दक्षिण मुंबईतील वरळीत ‘सीजय हाऊस’ इमारत बांधली. ज्या जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली, ती जमीन गुंड इक्बाल मिर्चीची होती. इक्बाल हा कुख्यात दाऊद इब्राहिमचे मुंबईतील काम पाहत होता. त्याच्या जमिनीवर ही इमारत बांधण्यात आल्याच्या मोबदल्यात इमारतीचा तिसरा व चौथा मजला पटेल यांच्या बांधकाम कंपनीने इक्बालची पत्नी हाझरा मिर्ची हिच्याकडे हस्तांतरित केला. पुढे इक्बाल मिर्चीचे नाव हवाला घोटाळ्यात आले. त्यामुळे ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी त्याची सर्व मालमत्ता ही हवालाच्या पैशांमधून खरेदी झाल्याचे समोर आले. त्यामुळेच ‘सीजय हाऊस’ विरुद्धदेखील ‘ईडी’ने कारवाई केली. याअंतर्गत इमारतीचा तिसरा व चौथा मजला जप्त करण्यात आला होता. त्या जागेचे सध्याचे बाजार मूल्य १०० कोटी रुपये आहे. इक्बाल मिर्चीचे पूर्ण कुटुंब या प्रकरणात फरार आहे.

‘ईडी’तील सूत्रांनुसार, याच इमारतीत प्रफुल्ल पटेल यांचादेखील फ्लॅट आहे. वरच्या मजल्यावर जवळपास ३५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट त्यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१९मध्ये त्यांचीदेखील ‘ईडी’ने या प्रकरणात तब्बल १२ तास चौकशी करून जबाब नोंदवला होता. त्यानंतर या इमारतीतील सर्व चार मजले जप्त करण्यात आले होते. त्यावर आता ‘ईडी’ने मोहोर उमटवली आहे.

Source link

ED and Iqbal MirchiIqbal Mirchi casepraful patelpraful patel newsप्रफुल्ल पटेल
Comments (0)
Add Comment